ढाका : तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसर्या व शेवटच्या सामन्यात भारताने बांगलादेशला ७७ धावांनी पराभूत करून अब्रू वाचवली आहे. बांगलादेशने २-१ ने मालिका खिशात घातली आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत ३१७ धावांचे मोठे आव्हान बांगलादेशला दिले. प्रत्युत्तरात बांगलादेशने सर्व गडी बाद २४० धावा केल्या. भारतीय संघासाठी धवल कुलकर्णी, आर.आश्विन आणि सुरेश रैनाने दोन-दोन विकेट घेतल्या. अंबाती रायडू आणि स्टुअर्ट बिन्नीने एक-एक विकेट घेतली.
तत्पूर्वी तिसर्या व शेवटच्या सामन्यात कर्णधार महेंद्रसिंह धोनी (६९) आणि शिखर धवनच्या (७५) शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने बांगलादेशला विजयासाठी ३१८ धावांचे आव्हान दिले आहे. टीम इंडियाने निर्धारित ५० षटकांत ६ बाद ३१७ धावा केल्या. अंबाती रायुडूने ४४ आणि सुरेश रैनाने ३८ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्टुअर्ट बिन्नीने ११ चेंडूत १७ धावा तर अक्षर पटेलने पाच चेंडूत १० धावा करून नाबाद परतले.
दुसरीकडे, बांगलादेशचा कर्णधार मशरफी मुर्तजाने ७६ धावा देऊन ३ विकेट घेतले. त्याचप्रमाणे मुस्तफिजुर रेहमान याने ५७ धावा देऊन दोन गडींना तंबूत पाठवले. शाकिब अल हसनला एक विकेट घेण्याची संधी मिळाली. या मालिकेत टीम इंडियाने पहिल्यांदा ३०० पेक्षा जास्त धावसंख्या उभी केली आहे.
दरम्यान, टीम इंडियाला पहिला झटका रोहित शर्माच्या रुपात बसला. मुस्तफिजुरच्या चेंडूवर विकेटकीपर लिट्टन दास याने रोहित शर्माला अलगद टीपले. रोहितने २९ चेंडूत २ चौकार आणि एक छटकाराच्या मदतीने २९ धावा केल्या.
टीम इंडियामध्ये दोन बदल करण्यात आले . भुवनेश्वर कुमार व रवींद्र जडेजाच्या ऐवजी उमेश यादव आणि स्टुअर्ट बिन्नीला संधी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बांगलादेश संघाकडून तस्किन अहमद खेळणार नाही. त्याच्या ऐवजी अराफात सनी खेळणार आहे.
तीन सामन्यांची वनडे मालिका यजमान बांगलादेशने आधीच २-० ने जिंकली आहे. त्यामुळे आता मालिकेतील तिसरा सामना जिंकून टीम इंडियाला ३-० ने क्लिनस्वीप देण्याची तयारी यजमानांनी केली आहे. मात्र, पराभवाचा सामना करणार्या टीम इंडियाला अखेरचा सामना जिंकून अब्रू वाचवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे.