नवी मुंबई : शेतकर्यांच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालणार्या ‘भू संपादन विधेयकाला’ कडाडून विरोध करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पुन्हा ठार मारण्याची धमकी देणारे पत्र आल्याने शेतकरी आणि त्यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या महिन्याभरात धमकी देणारे हजारे यांना आलेले हे दुसरे पत्र आहे.
शेतकर्यांच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी केंद्रातील भाजपा सरकारने भूसंपादन विधेयक आणले. साम ,दाम, दंड, भेद वापरून हे विधेयक पारीत करण्याचा घाट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने घतला आहे. राज्यसभेत भाजपाचे संख्याबळ कमी असल्याने तिथे विधेयक अडू शकते. म्हणून आता दोन्ही सभागृहाचे संयुक्त अधिवेशन बोलावून हे विधेयक मंजूर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याला विरोध करण्यासाठी अण्णा हजारे यांनी दंड थोपटले असून त्याला देशभरात जोरदार पाठिंबा मिळत आहे.
कॉंग्रेससह अनेक राजकीय पक्षांचा या विधेयकाला विरोध आहे. या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांना धमकी देणारे पत्र आले आहे. संजय घोलप नावाच्या व्यक्तीने हे धमकीचे पत्र पाठवले आहे. नगर जिल्ह्यातील राहाता येथील पत्ता असलेल्या या व्यक्तीने भूसंपादन विधेयकाला असलेला विरोध मागे घेण्याची मागणी पत्रात केली आहे. ‘भूसंपादन विधेयकाला विरोध करू नका अन्यथा संपवून टाकू’ अशी धमकीच पत्रात देण्यात आली आहे.
हजारे यांना काही दिवसांपूर्वी धमकीचे असेच पत्र आले होते. याबाबत अण्णांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. या धमक्यांना भीक न घालता या विधेयकाविरोधातील आपली लढाई सुरूच राहील, असे हजारे यांनी म्हटले आहे.