अलिबाग : अलिबागजवळच्या रेवदंडा समुद्र किनार्यावर बुधवारी सायंकाळी महाकाय व्हेल मासा जखमी अवस्थेत आढळून आला. या माशाचा अखेर गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. या माशाची लांबी तब्बल ४२ फूट असून वजन सुमारे दोन हजार किलो इतके आहे.
मोठ्या मालवाहू जहाजाची धडक लागल्याने या महाकाय माशाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या माशाला समुद्रातून जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढून परिसरात दुर्गंधी पसरू नये यासाठी किनार्याजवळच पुरण्यात आले. समुद्रकिनारी देवमासा आल्याचे वृत्त समजताच या माशाला पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
स्थानिक मच्छिमारांनी वनविभागाच्या अधिकारी आणि जेसीबीच्या मदतीने त्याला खोल समुद्रात सोडण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. बरेच दिवस पुरेसे अन्न न मिळाल्याने तो अशक्त झाला होता, अखेर आमचे प्रयत्न अयशस्वी ठरले, अशी माहिती वनविभागाच्या अधिकार्यांनी दिली.