मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबई तुंबली त्याचा गहजब झाला. मात्र पावसामुळे अहमदाबादमध्ये नाले भरले आणि पाणी साचलं. त्याची चौकशी कोण करणार, असा थेट सवाल करत, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजप नेतृत्वावरच निशाणा साधला आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमामध्ये बोलताना, उद्धव ठाकरे यांनी आपल्याच मित्रपक्षावर अशाप्रकारे शरसंधान करण्याची आयती संधी साधली. यावेळी विनोद तावडे यांची पदवी, तसंच पंकजा मुंडे यांच्यावरचा आरोप, याबाबत विचारलं असता. मुख्यमंत्री याबाबत योग्य तो निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया उद्धव यांनी दिली.
यावेळी विनोद तावडेंना त्यांनी टोला लगावला. सध्या डिग्रीवरून महाभारत सुरू आहे. राजकारणात सध्या खोट्या डिग्री दाखवणं सुरू आहे. कशाला खोट्या डिग्री मिरवता. वसंतदादा तर सातवी पास होते, पण त्यांनीही चांगले राज्य चालवले.
पंकजा मुंडेंवरील आरोप गंभीर आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी याविषयी निर्णय घ्यावा, असे उद्धव ठाकरे म्हणालेत. दरम्यान, कोस्टल रोड प्रकल्प कोळी बांधवांना बेघर करणारा नसेल. त्यांच्या रोजीरोटीवर टाच आणणारा नसेल. त्यांचे समाधान करूनच कोस्टल रोड पूर्ण करू, असे उद्धव म्हणालेत.
सुभाष देसाई शिताफिने मंत्रीपदाची जबाबदारी संभाळतायत. ते नेहमी हात बांधून बसतात. कारण विनाकारण कोणी त्यांच्या खत्यातून पैसे काढून घेऊ नयेत याची काळजी व्यवस्थित घेतात. अनिल देसाई सुद्धा शिवसेनेत महत्वाची भूमिका बजावतात. पडद्या मागच्या हालचाली महत्वाच्या असतात. एकवेळेस आम्हाला विसरलात तर चालेल मात्र यांना विसरून चालणार नाही.