संदीप खांडगेपाटील : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : महापालिका सभागृहात स्वीकृत नगरसेवक नियुक्त होण्याच्या घटनेला सहा दिवसाचा कालावधी लोटला तरी महापालिकेच्या संकेतस्थळावर स्वीकृत नगरसेवकांची नावेच टाकण्यात आलेली नाहीत. महापालिकेची वेबसाईट अपडेट करण्यास संबंधित विभागाकडून नेहमीच उदासिनता दाखविली जात असल्याचे पुन्हा एकवार पहावयास मिळाले.
१११ नगरसेवकांच्या पाचव्या सभागृहात पाच स्वीकृत नगरसेवक १० जुलै २०१५ रोजी निवडण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तीन व शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचा समावेश आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, कुकशेेतचा ढाण्या वाघफेम सुरज पाटील, घनशाम मढवी, शिवसेनेकडून मनोज हळदणकर, राजेश शिंदे असे पाच जण स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडण्यात आले.
महापालिकेच्या संकेतस्थळावर आजही स्वीकृत नगरसेवकांची निवड अपडेट करण्यात आली नसून त्या ठिकाणी जागा रिकामीच दाखविण्यात येत आहे. यापूर्वीही महापालिकेची वेबसाईट अपडेट वेळेवर होत नसल्याच्या अनेक घटना उजेडात आल्या आहेत. महापालिकेची वेबसाईट अपडेट करण्याच्या प्रकारात महापालिकेच्या संबंधित विभागाकडून दाखविण्यात येत असलेल्या उदासिनतेविषयी शिवसेनेचे माजी नगरसेवक रतन नामदेव मांंडवे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.