आमदार संदीप नाईक यांची विधानसभेत मागणी
संजय बोरकर : ९८६९९६६६१४
मुंबई : नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या हिताच्या मागण्यांसाठी आमदार संदीप नाईक यांनी विधानसभा अधिवेशनामध्ये जोरदार आवाज उठविला असून जोपर्यंत गावठाण हद्द निश्चित होत नाही तोपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांवरील कारवाई स्थगित करावी, अशी मागणी औचित्याचा मुद्दा मांडून त्यांनी शुक्रवारी केली आहे.
नवी मुंबई शहराच्या निर्मितीसाठी ग्रामस्थांच्या हजारों एकर जमिनी सिडको महामंडळाने कवडीमोल भावाने संपादित केल्या. या प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन करण्यात येईल हे सिडकोने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकडे सिडकोने दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी मूळ गावठाण आणि गावठाणात गरजेपोटी निवासासाठी आणि उदरनिर्वाहासाठी बांधकामे केली ही सर्व बांधकामे नियमित करावीत यासाठी प्रकल्पग्रस्त सातत्याने मागणी करीत आहेत. आमदार संदीप नाईक यांनी सातत्याने ही मागणी मंजूर करुन घेण्यासाठी विधानसभेमध्ये पाठपुरावा केलेला आहे. २०१३ च्या अधिवेशनामध्ये उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर शासनाने दिलेल्या उत्तरात मुळ गावठाण आणि गावठाणातील बांधकामाबाबत प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांशी चर्चा करुन त्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल , असे सांगण्यात आले होते. याशिवाय याविषयी मंत्रालयात ग्रामस्थांसमवेत बैठक आयोजित करण्यात येईल, असेही शासनाच्यावतीने उत्तर देण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांशी चर्चा न करताच गावठाणातील बांधकामांसाठी शासनाने फेब्रुवारी २०१५ मध्ये क्लस्टर योजना जाहीर केली. मात्र या योजनेमध्ये अनेक बाबींचा अभाव असल्याचे आमदार नाईक म्हणाले. २०१२ सालापर्यंतची २०० मिटर परिघा ऐवजी ५०० मिटर परिघापर्यंतची बांधकामे नियमित करण्याची मागणी असताना सिडकोने २०० मिटर परिघानंतरच्या बांधकामांवर कारवाई सुरु केली आहे. सिडकोच्या या कारवाईमुळे प्रकल्पग्रस्तांच्या मनात सिडको आणि शासनाच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाल्याचे आमदार नाईक म्हणाले. सिडकोने अद्याप गावठाण हद्दच निश्चित केली नाही. त्यामुळे २०० मिटरची हद्द कोठून धरायची याविषयी सिडको आणि ग्रामस्थांमध्ये संभ्रम आहे. हद्द निश्चितीसाठी सिडकोने समिती गठित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जोपर्यंत सिडको आणि शासन प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांना विश्वासात घेउन गावठाण हद्द निश्चित करीत नाही तोपर्यंत सिडकोने प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांवर सरसकट सुरु केलेली कारवाई तातडीने थांबवावी, अशी आग्रही मागणी आमदार संदीप नाईक यांनी औचित्याच्या मुद्यामध्ये केली आहे.