नवी दिल्ली : पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफिज याच्या गोलंदाजीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे.
चेन्नई येथे श्री रामचंद्र विद्यापिठात सहा जुलै रोजी त्याच्या गोलंदाजीची चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत हाफीजची गोलंदाजी ‘फेकी’ असल्याचे निदर्शनास आल्याने त्याच्या गोलंदाजीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) एक वर्षाची बंदी घातली आहे.
चेंडू टाकताना गोलंदाजाचा हात १५ अंशापेक्षा जास्त वळता कामा नये, असा आयसीसीचा नियम आहे. मात्र हफीजचे सर्वच चेंडू या नियमाचा भंग करत असल्याचे या तपासणीत स्पष्ट झाले, असे आयसीसीने म्हटले आहे.
पाकिस्तान व श्रीलंका यांच्यादरम्यान गेल येथे १७ ते २१ जून दरम्यान झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा विजय झाला होता. यावेळी हाफिजच्या गोलंदाजीवर प्रश्न उपस्थित झाला होता. हा सामना संपल्यानंतर अधिकार्यांनी नियमानुसार त्याच्या गोलंदाजीची चाचणी करण्याची सूचना दिली होती.
यापूर्वी नोव्हेंबर २०१४ मध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंडमधील अबू धाबी कसोटीदरम्यान हाफिजची गोलंदाजी संशयास्पद आढळल्याने त्याच्यावर विश्वचषकापूर्वीच बंदी घालण्यात आली होती.
त्यानंतर हाफिजने गोलंदाजी शैलीत सुधारणा केल्याने एप्रिल २०१५ मध्ये त्याला पुन्हा गोलंदाजी करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र त्याच्या गोलंदाजीची शैली आक्षेपार्ह वाटल्याने त्याला पुन्हा चाचणीसाठी आवाहन केले होते. त्यानुसार आयसीसीने चेन्नई येथे सहा जुलै रोजी त्याची चाचणी घेतली. मात्र या चाचणीतही हाफिजची गोलंदाजी फेकी असल्याचे निष्पन्न झाले.
दोन वर्षात हाफिजवर दोनदा कारवाईची नामुष्की ओढावली आहे. दुस-यांदा कारवाई झाल्याने आता हाफिजला एक वर्षानंतरच चाचणी देता येणार आहे. यापूर्वी पाकिस्तानच्या सईद अजमलवरही गोलंदाजीच्या सदोष शैलीमुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
सध्या श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दोन सामन्यांत मोहम्मद हाफिजने सहा बळी घेतले. त्यामुळे हाफीजवर घातलेल्या बंदीमुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.