ठाणे : ठाणे जिल्ह्यातील नया नगर येथे एका बारवर पोलिसांनी मारलेल्या छाप्याचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर बारच्या कर्मचार्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये एका पत्रकाराचा मृत्यू झाला असून, दोन पत्रकार जखमी झाले आहेत. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
राघवेंद्र दुबे असे मृत पत्रकाराचे नाव असून, बारपासून काही अंतरावर त्यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष मिश्रा आणि शशी शर्मा हे स्थानिक नियतकालिकाचे पत्रकार नया नगर येथील व्हाईट हाऊस बारवर पडलेल्या पोलिस छाप्याचे वृत्तांकन करण्यासाठी गेले होते.
छाप्याची छायाचित्रे काढत असताना बारच्या कर्मचार्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर राघवेंद्र दुबे वृत्तांकनासाठी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ते मीरा रोड पोलिस स्थानकातही गेले.
पहाटेच्या सुमारास मीरा रोड पोलिस स्थानकातून बाहेर पडल्यानंतर मीरा-भाईंदर रस्त्यावरील एस.के.स्टोन येथे त्यांचा मृतदेह सापडला. मागच्या २४ तासात मुंबई-ठाणे परिसरात पत्रकारावर झालेल्या हल्ल्याची ही तिसरी घटना आहे.
मुंबईतील पत्रकारांनी या हल्ल्याचा निषेध करताना आरोपींवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. पत्रकार संरक्षण कायद्याला विरोधकांनी पाठिंबा दिला असून, या घटनेमुळे देवेंद्र फडणवीस सरकारवर दबाव वाढणार आहे.