नवी मुंबई : विरंगुळा केंद्रे निर्माण करुन नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील ज्येष्ठ नागरिकांना एकमेकांना भेटण्याच्या, सहज संवाद साधण्याच्या हक्काच्या जागा दिल्या आणि आपुलकीचा आधार देण्याचे कर्तव्य केले अशा भावनात्मक शब्दात मनोगत व्यक्त करीत नवी मुंबईचे महापौर श्री. सुधाकर सोनवणे यांनी महानगरपालिका निर्माण करीत असलेल्या वास्तू या सार्वजनिक वापरासाठी असल्याने त्याची काळजी घेण्याची जबाबदारी महानगरपालिकेप्रमाणेच समाजाचीही आहे ही भूमिका मांडत या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राची निगा येथील ज्येष्ठ नागरिक आनंदाने राखतील असा विश्वास व्यक्त केला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र.७७ येथील मोराज सर्कल, सानपाडा जवळील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी महापौर सुधाकर सोनवणे यांच्या समवेत उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, सभागृह नेता जयवंत सुतार, स्थानिक नगरसेविका वैजयंती दशरथ भगत, नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, नगरसेविका फशीबाई भगत, रुपाली भगत, संगिता बोर्हाडे, कु. रुचा पाटील, माजी नगरसेवक दशरथ भगत, कार्यकारी अभियंता शंकर पवार आदी उपस्थित होते.
उपमहापौर अविनाश लाड यांनी यावेळी बोलताना ज्येष्ठ नागरिकांसाठी हे सेकन्ड होम असल्याचे सांगत आजोबांसोबत याठिकाणी उद्यानात येणार्या मुलांसाठी खेळण्यांची मागणी केली. माजी नगरसेवक दशरथ भगत यांनीही काळाची गरज ओळखून वृध्दाश्रम चालविण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा असे मत व्यक्त केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सानपाडा से. १३ येथील भू.क्र. ८ वर ज्येष्ठ नागरिकांसाठी ६३८ चौ.फुटाचे विरंगुळा केंद्र उभारण्यात आले असून या वास्तूच्या आकर्षक बांधणीचा उल्लेख सर्वच वक्त्यांनी केला. विरंगुळा केंद्र ठिकाणी प्रसाधनगृहाची व्यवस्था करण्यात आली असून यामध्ये लवकरच ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक फर्निचरसह कॅरम, बुध्दीबळ, नियतकालिके, टि.व्ही., अशाप्रकारे विविध मनोरंजनपर साहित्य उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कार्यान्वित होत असलेले हे १५ वे विरंगुळा केंद्र असून ज्येष्ठ नागरिकांचा आत्मियतेने विचार करुन अशाप्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देणारी नवी मुंबई ही देशातील अग्रगण्य महानगरपालिका म्हणून नावाजली जात असल्याबद्दल महापौर सुधाकर सोनवणे यांनी अभिमान व्यक्त करीत ही आमच्या भविष्यासाठीही म्हणजेच आम्ही ज्येष्ठ नागरिक झाल्यानंतर आमच्यासाठीही उत्तम सोय असल्याचे सांगितले.