संजय बोरकर : ९८६९९६६६१४
* तीस शौचालये नवी मुंबईत बांधली जाणार !
* मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलैला शुभारंभ!
नवी मुंबई : शहरात उघड्यावर अनेक ठिकाणी शौचास बसणारे नवी मुंबईकर हे चित्र या शहराला भूषणावह नसल्याने बेलापुरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी स्वच्छतेसाठी पहिले पाऊल उचलले असून आमदार निधीतून दोन कोटी रूपये या शौचालयांवर खर्च करण्यास अनुमती दिली आहे. शहरात असलेल्या ३० ठिकाणी येत्या काळात ही शौचालये बांधली जाणार असून त्याचा शुभारंभ २२ जुलै रोजी केला जाणार आहे.
पुण्याहून नवी मुंबईत आलेल्या व ठाण्याहून पुणे-गोव्याकडे जाणार्या वाहनचालकांना पहाटे व सकाळी तुर्भे या ठिकाणी उघड्यावर बसणार्या रहीवाशांचे दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे नवी मुंबई शहराचा कारभार हाकणार्या महापालिकेला गेल्या कित्येक वर्षात ही अस्वच्छता दूर करता आलेली नाही. येथील नगरसेवकांनीही त्यादृष्टीने कधी प्रबोधनाचे कार्य केल्याचे कुठे पहावयास मिळाले नाही. राज्यात संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानात दोनदा प्रथम क्रमाकांचा पुरस्कार कोणत्या निकषावर नवी मुंबई महापालिकेस मिळाले, त्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. काही गावांमध्येदेखील घराच्या जवळ वाहणार्या उघड्या गटारात पालक आपल्या पाल्यांना शौचास बसवित असल्याचे दिसून आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचा विडा उचलला आहे. त्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात असून विविध मान्यवरांच्या माध्यमातून प्रबोधन केले जात आहे. सायबर सिटी, प्लॅन सिटी, एज्ुकेशम हब, ग्रीन सिटी अशी अनेक विशेषणे लावणार्या नवी मुंबईमध्ये उघड्यावर शौचास बसणार्यांचे प्रमाण कमी नाही. सिडनीच्या पार्श्वभूमीवर सिडकोने बांधलेल्या तुर्भे रेल्वे स्थानकासभोवतालचा परिसर या उघड्यावर शौचास बसणार्यांनी व्यापून टाकला आहे.
ठाणे-बेलापुर मार्गावर तुर्भे, दिघा, शिरवणे यासारख्या झोपडपट्टी भागात आजही रस्त्यावर शौचास बसण्याचे प्रमाण जास्त आहे. विकसित शहर तथा सायबर सिटी म्हणवून घेणार्या नवी मुंबई शहराच्या नावलौकीकास हे चित्र भूषणावह नसल्याची नाराजी यापूर्वीही आमदार मंदाताई म्हात्रे यांनी वेळोवेळी बोलून दाखविली आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या उपलब्ध सेवेवर अवलंबून न राहता आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीतून दोन कोटी रूपये खर्चाची ३० शौचालये बांधण्याचा निर्धार जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा स्वच्छतेच्यादृष्टीने पहिले पाऊल पडणार असून राज्यातील हा पहिला प्रकल्प असल्याची माहिती आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दिली आहे.