श्रीनगर : ईदच्या निमित्ताने भारतीय जवानांनी दिलेली मिठाई नाकारल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत नियंत्रण रेषेवरील भारतीय चौक्यांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे.
जम्मू-काश्मीरमधील पूँछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील भारतीय चौक्यांवर दुपारपासून पाकिस्तानी लष्कराकडून अंदाधुंद गोळीबार सुरु आहे. छोटया आणि स्वयंचलित शस्त्रास्त्रांचा वापर पाकिस्तानकडून करण्यात येत असून, भारतीय जवानही तशाच शस्त्रास्त्रांचा वापर करुन चोख प्रत्युत्तर देत आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये ईद सर्वत्र उत्साहात साजरी होत असताना पाकिस्तानकडून गोळीबार सुरु आहे. मागच्या आठवडयात रशियाच्या उफा शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यात भेट झाली होती.
त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्यामुळे संबंध सुधारण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र आठवड्याभराच्या आतच पाकिस्तानने आपल्या मूळ वृत्तीनुसार खरे रंग दाखवले होते. ईदच्या निमित्ताने सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानी लष्कराला दिलेली मिठाईही पाकिस्तानने नाकारली. पाकिस्तानी लष्कराने शुक्रवारी रात्रीही भारतीय चौक्यांना लक्ष्य केले होते.