नवी दिल्ली : देशभरात रमजान ईद उत्साहात साजरी होत आहे. मुस्लिम बांधवांनी ईदच्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छाही दिल्या. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी ट्विटरवरुन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी तसेच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ईदच्या शुभेच्छा दिल्या.
ईदच्या निमित्ताने माझ्याकडून शुभेच्छा असे पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटले आहे. ईद उल फित्र च्या निमित्त मी सर्व देशबांधवांना खासकरुन सर्व मुस्लिम बंधू आणि भगिनींना शुभेच्छा देतो असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे.
शुक्रवारी चंद्रदर्शन झाल्यानंतर जामा मशिदीचे इमाम बुखारी यांनी शनिवारी ईद साजरी करण्याबाबतची घोषणा केली. देशातील अनेक मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाजपठणासाठी गर्दी केली होती. ‘ईद उल फित्र’ निमित्त देशभरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
रमजान हा इस्लामिक चांद्र पंचांगातील नववा महिना आहे. या काळात सूर्योदयापासुन सुर्यास्तापर्यंत उपवास करुन रोजा पाळला जातो. महिनाभर रोजे पाळून इंद्रिये आणि मनावर संयम ठेवण्याचा आणि बंधुत्वाचा संदेश देण्यात येतो.