नवी मुंबई : केंद्र, राज्य सरकार वा स्थानिक स्वराज्य संस्था आदी ठिकाणी कार्यरत कर्मचार्याना पदोन्नती व पदनिर्मिती या स्वरूपाची समस्या निर्माण होत असते. मागासवर्गीय कर्मचार्यांना तर याबाबत न्यायालयीन लढाई लढावी लागते. असे असले तरी कामगारांनी आपल्या कर्तव्याशी आणि कामाशी प्रामाणिक राहीले तर अधिकार मिळतातच, असे मत नवी मुंबई चे महापौर सुधाकर सोनवणे यानी व्यक्त केले
शुक्रवारी, दि. १७ जुलै रोजी दुपारी बेलापुर येथील नवी मुंबई महापालिका मुख्यालयातील ज्ञान केंद्र सभागृहात महापौर सुधाकर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई महानगरपालिका मागासवर्गिय व इतर मागासवर्गिय अधिकारी कर्मचारी महासंघाचा स्नेह मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
मागासवर्गिय कर्मचार्यांनी आपणास घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटनेत तरतूद केलेल्या आरक्षणामुळे नोकरीची संधी मिळाल्याचे सांगत आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हे ध्यानात घेऊन समाजाशी बांधीलकी ठेवावी असे आवाहन महापौर सोनवणे यांनी केले.
महापौर सुधाकर सोनवणे यांनी आपल्या हक्कासाठी जागरुक असणारी तसेच अन्यायाविरोधात सनदशीर मार्गाचा अवलब करणार्या मनपातील मागासवर्गिय अधिकारी व कर्मचारी महासंघाच्या कार्याचा गौरव केला. आपल्या समस्या व प्रश्न सोडविण्याकरिता तसेच कर्मचारी व प्रशासनमध्ये सुसंवाद रहाण्याकरीता लवकरच कमिटी स्थापन व्हावी याकरीता आपले पुर्ण सहकार्य असेल असेही महापौरांनी यावेळी स्पष्ट केले.
या स्नेह मेळाव्यात कार्य. अभियंते शंकर पवार, आरोग्य अधिकारी डॉ.रमेश निकम, डॉ कैलाश गायकवाड, शशिकांत आवळे, विश्वकांत लोकरे, अँड.अभय जाधव आदींनी आपले विचार मांडत उपस्थितांना मार्गदर्शन केले. या स्नेह मेळाव्यास मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.