मुंबई : मांसाहार करायचा नसेल तर आपापल्या राज्यांमध्ये चालते व्हा, असा इशारा कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी अमराठी लोकांना दिलाय.
मांसाहार करत असल्यानं एका मराठी कुटुंबाला अमराठी रहिवाशांनी बेदम मारहाण केल्याची घटना दहिसरमध्ये घडलीय. यामुळं पुन्हा एकदा मांसाहारी विरूद्ध शाकाहारी असा वाद उफाळून आला.
मच्छीमटण खाणं हा काही गुन्हा नाही. पण गोविंद चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबाला मात्र त्याची शिक्षा भोगावी लागली. दहिसरच्या बोना व्हेंचर सोसायटीत हा संतापजनक प्रकार घडला. मांसाहार करत असल्यानं चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबाला अमराठी रहिवाशांनी चोप दिला तसंच शिवीगाळही केली. पेशाने मराठी नाट्य निर्माते असलेल्या चव्हाणांच्या घरी सोसायटीतल्या अमराठी रहिवाशांनी अंडी तसंच चिखलही फेकल्याचं चव्हाण यांनी म्हटलंय.
बोना व्हेंचर इमारतीत एकूण १४० घरं आहेत. त्यापैकी तब्बल ८० टक्के रहिवाशी अमराठी आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून तिथल्या रहिवाशांमध्ये मराठी-अमराठी वाद सुरू आहे. त्या वादाचा असा भडका उडाला. दरम्यान, या वादाला आता राजकीय वळण लागलंय. मराठीचा कैवार घेत शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते या इमारतीत धडकले. निषेध म्हणून त्यांनी इमारतीच्या आवारात मच्छीही फेकली.
तसंच या नितेश राणेंनीही या कुटुंबीयांची भेट घेत मराठी जणांना आपला पाठिंबा असल्याचं व्यक्त केलंय. यातलं राजकारण बाजूला ठेऊया. मात्र आपल्या घरात काय खावं आणि काय नाही, हे ठरवण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. ते ठरवण्याचा अधिकार इतरांना कुणी दिला? मांसाहार करतो म्हणून अशी दादागिरी करणं खरंच योग्य आहे का?