स्वयंम फिचर्स : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेतील स्विकृत नगरसेवक व नवी मुंबईच्या राजकारणात कुकशेतचा ढाण्या वाघ म्हणून ओळखल्या जाणार्या सुरज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेली ‘पावसाळी फोर्टी प्लस’ स्पर्धा बोनकोडे संघाने जिंकली. अंतिम सामन्यात बोनकोडे संघाने बेलापुर संघाचा दणदणीत पराभव केल्याने अंतिम सामना एकतर्फीच ठरला.
नवी मुंबईतील सर्वोत्तममधील एक अशा क्रिडांगणावर गणल्या जाणार्या कुकशेत गावातील हिरव्यागार गालिचाफेम क्रिडांगणावर कुकशेत गावातील जय गजानन मित्र मंडळाच्या वतीने नगरसेवक सुरज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या पावसाळी स्पर्धेचे फोर्टी प्लस संघाकरीता आयोजन करण्यात आले होते. रविवारी सांयकाळी झालेल्या बोनकोडे व बेलापुरमधील अंतिम सामन्यात बेलापुर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
सामनाच नाही तर स्पर्धाच जिंकण्याच्या आवेशात बोनकोडेच्या संघाने पहिल्या चेंडूपासून आक्रमक फलदांजी करण्यास सुरूवात केली. पहिल्याच चेंडूवर षटकार मारत बोनकोडेकरांनी आपली आक्रमकता दाखविण्यास सुरूवात केली. पहिल्याच षटकात बोनकोडेकरांनी षटकारांची आतषबाजी करत तब्बल २६ धावा सलामीवीरांनी काढल्या. तेथेच सामना रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली. दुसर्या षटकात १८ धावा काढल्याने दोन षटकात ४० धावा धावफलकावर लागल्या. उर्वरित तीन षटकात विकेट पडल्याने अवघ्या ३० धावाच निघाल्या. बोनकोडेकरांनी अंतिम सामन्यात बेलापुरकरांकरता पाच षटकात विजयासाठी ७१ धावा करण्याचे आव्हान दिले.
बेलापुरच्या संघातही तगडे फलदांज असल्याने सामना रंगतदार होण्याची शक्यता क्रिकेट रसिकांकडून व्यक्त केली जात होती. तथापि पहिल्या षटकातच सामन्याचा कल स्पष्ट झाला आणि अंतिम सामना एकतर्फीच होणारअसल्याचे स्पष्ट संकेत प्राप्त झाले. दुसर्या षटकात बेलापुर संघाच्या धावफलकावर ४ विकेट व १२ धावा होत्या. तिसर्या षटकामध्ये बेलापुरकरांनी विकेट न गमावत ५ धावा काढल्या. तिसरे षटक संपल्यावर स्पर्धेचा निकाल स्पष्ट झाल्याने प्रेक्षकांनी काढता पाय घेण्यास सुरूवात केली.
गावातील जय गजानन मित्र मंडळाने या फोर्टी प्लस पावसाळी क्रिकेट स्पर्धेचे सुरेख आयोजन केले होते. दर्जेदार सूत्रसंचालनाने स्पर्धेत खर्या अर्थांने उत्साह निर्माण केला. ही स्पर्धा बोनकोडे संघाने ३३ धावांनी दणदणीत जिंकली असली तरी अंतिम सामना एकतर्फी झाल्याने क्रिडारसिकांची घोर निराशा झाली.