** निर्नायकी नेतृत्वामुळे नवी मुंबईतील शिवसैनिक आजही संभ्रमातच!
स्वयंम फिचर्स : 8082097775
नवी मुंबई : राज्यासह केंद्रात सत्ताधारी असलेल्या व नवी मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका बजावणार्या शिवसेनेला नवी मुंबई जिल्हाप्रमुख पदाकरता अद्यापि योग्य व सक्षम शिवसैनिकांचा शोध न घेता आल्याने शिवसैनिकांत नाराजी व्यक्त केली जात आहे. पाच महिने नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख पद रिक्त असल्याने सध्या नवी मुंबईची शिवसेना निर्नायकी अवस्थेत वाटचाल करत असून नवी मुंबईतील शिवसैनिकही संभ्रमावस्थेतच संघटनात्मक वाटचाल करत आहेत.
तत्कालीन जिल्हाप्रमुख व महापालिकेतील विद्यमान विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यावर आरोप झाल्याने महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीच्या अगोदर चौगुलेंना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक तोंडावर असल्याने कोणाला पद देवून अन्य कोणते गट नाराज होवू नये म्हणून हे पद शिवसेनेने रिक्तच ठेवले. खासदार राजन विचारे, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व उपनेते विजय नाहटा या त्रिमूर्तीच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने नवी मुंबई महापालिकेची निवडणूक लढविली. सत्ता मिळण्याची हमखास शक्यता असतानाही भाजपाशी झालेली युती आणि शिवसैनिकांची जागावाटपावरून वाढती नाराजी यामुळे शिवसेना सतेपासून वंचित राहीली. युती करूनही शिवसेनेला अवघ्या 38 जागांवर समाधान मानावे लागले. भाजपाने जागा लढवूनही त्यांना अवघ्या 6 जागांवरच विजय मिळाला. भाजपाच्या अधिकाधिक जागांवर शिवसैनिकांनी बंडखोरी केल्याने भाजपाचे कमळ फुलण्यास धनुष्याच्या शिलेदारांनीच अडथळे आणल्याचे चित्र निवडणूकीदरम्यान नवी मुंबईकरांना उघडपणे पहावयास मिळाले.
जिल्हाप्रमुख पद रिक्त असले तरी विद्यमान विरोधी पक्ष नेते विजय चौगुले, उपजिल्हाप्रमुख अॅड. मनोहर गायखे, नामदेव भगत, सुकुमार किल्लेदार, विठ्ठल मोरे आदींची नावे शिवसैनिकांमध्ये चर्चिली जात आहे. चौगुले हे सध्या विरोधी पक्षनेते असल्याने एक व्यक्ति, एक पद या निकषावर त्यांचा नेतृत्वाकडून विचार होण्याची शक्यता धुसर आहे. अॅड. मनोहर गायखे हे कडवट व निष्ठावंत शिवसैनिक असून शिवसेनेत ग्रासरूटपासून त्यांनी काम केले आहे. शिवसेनेच्या विविध सेलचा कार्यभारही त्यांनी सक्षमपणे सांभाळलेला आहे. लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद आदी निवडणूकांत अॅड. गायखेंच्या नावाची चर्चा होते, पण गायखेंच्या पदरात काही पडत नाही असा अनुभव असल्याने वरिष्ठांकडून गायखेंवर झालेला अन्याय पाहता आता तरी गायखेंना कितपत न्याय मिळेल याबाबत खुद्द शिवसैनिकच साशंक आहेत.
नामदेव भगत हे महापालिका निवडणूकीपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत आले असले तरी महापालिका निवडणूकीनंतर नामदेव भगत यांनी नवी मुंबईतील विविध समस्यांवर महापालिका, सिडको, मंत्रालय, पोलीस आयुक्तालय आदी ठिकाणी झंझावात निर्माण केल्याने व मिडीयातूनही त्याला मुबलक प्रमाणात प्रसिध्दी मिळाल्याने नवी मुंबईतील नामदेव भगत शिवसेनेत नावारूपाला आले आहेत. फेसबुक व व्हाट्स अपवर नामदेव भगतांची आक्रमकता शिवसैनिकांमध्ये चर्चेचा विषय आहे. शिवसेनेत अनंत तरेनंतर ठाणे जिल्ह्यात कोळी समाजाचे नेतृत्व म्हणून नामदेव भगतांकडे पाहिले जात आहे.
सुकुमार किल्लेदार हे वादळही नवी मुंबई स्तरावरील शिवसेनेत सुरूवातीच्या काळातील आक्रमक नेतृत्व म्हणून परिचित होते. मनसेव त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास करून सुुकुमार किल्लेदार पुन्हा स्वगृही परतले आहेत. एक पर्यावरणप्रेमी अशी नवी मुंबईत त्यांची प्रतिमा आहे. खारफुटीच्या रक्षणासाठी त्यांचा संघर्ष नवी मुंबईकरांनी जवळून पाहिलेला आहे. शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नवी मुंबई जिल्हाप्रमुख पदाकरता दावा करत किल्लेदार यांनी आपला बायोडाटा सादर केल्याची चर्चाही शिवसैनिकांत आहे. लोकसभा निवडणूकीत रथयात्रेच्या प्रचाराची धुरा सांभाळत त्यांनी बेलापुर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा झंझावात निर्माण केला होता.
विठ्ठल मोरे हे जुनेजाणते शिवसैनिक असून सध्या संघटनेत बेलापुर विधानसभा संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. मधल्या काळात त्यांनी काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा केला होता. परंतु त्यांना शिवसेना नेतृत्व कितपत जिल्हाप्रमुख पदाची धुरा देईल याबाबत शिवसैनिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विद्यमान विरोधी पक्ष नेते विजय चौगुले, उपजिल्हाप्रमुख अॅड. मनोहर गायखे, नामदेव भगत, सुकुमार किल्लेदार, विठ्ठल मोरे आदींची नावे शिवसैनिकांमध्ये चर्चिली जात असली तरी अॅड. मनोहर गायखे आणि नामदेव भगत या दोनपैकी एकाच नावावर जिल्हाप्रमुख पदाकरता शिवसेना नेतृत्व विचार करण्याची शक्यता शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे. महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने नवी मुंबईची धुरा अनंत सुतारांसारख्या आक्रमक नेतृत्वाकडे दिलेली असल्याने उध्दवसाहेबांनी लवकरात लवकर नवी मुंबईला जिल्हाप्रमुख द्यावा, अजून काही काळ हे भिजत घोंगडे ठेवणे शिवसेनेसाठी योग्य नसल्याचा टाहो शिवसैनिकांकडून फोडला जात आहे.