नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशीस्थित विष्णूदास भावे नाट्यगृहाच्या दुर्रावस्थेकडे मनसेने प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर विष्णूदास भावे नाट्यगृह सुविधांच्या बाबतीत नव्याने कात टाकणार असल्याची माहिती मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वीच नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाबरोबर महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नवी मुंबईतील एकमेव अशा विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या दुरावस्थेबाबत पाहणी दौरा करून परिस्थिती समजून घेतली व संबंधित यंत्रणांना तात्काळ दुरुस्तीचे आदेश दिले होते. या आदेशानंतर मनपा प्रशासनाने नाट्यगृहातील प्रत्येक समस्येचा अभ्यास करून प्रस्ताव तयार करून नाट्यगृहाच्या दुरुस्तीच्या कामास सुरुवात केली असल्याचे मनसेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
यासंदर्भात पालिका आयुक्तांच्या पाहणी दौर्यानंतर नाट्यगृहातील दुरुस्तीच्या कामाशी संबंधित प्रशासनातील प्रत्येक अधिकार्यांकडे मनसेने पाठपुरावा केला. नाट्यगृह व्यवस्थापक व सह.आयुक्त दिवाकर समेळ यांनी तर लेखी स्वरुपात मनसेला पत्रव्यवहार केला असून मनसेने केलेल्या नाट्यगृहाविषयीच्या कामांबाबत सूचना स्वागतार्ह असल्याचे म्हटले आहे. तसेच मनसेने केलेल्या विविध सूचनांवर विविध स्तरांवर कार्यवाही सुरु झाली असल्याचे कळविले आहे. नाट्यगृहाच्या महसूलात वाढ व्हावी व नवी मुंबईतील मराठी प्रेक्षकांना उत्तम मराठी सिनेमे पाहता यावेत यासाठी सकाळ, दुपारच्या सत्रात नाट्यगृहात मराठी सिनेमे पाहण्याची सोय करावी तसेच नाट्यगृहात पुस्तकांचे दालन सुरु करावे या मनसेच्या मागणीवर महापालिका सकारात्मक असून प्रशासकीय पातळीवर याची मंजुरी होऊन ते सुरु करू असे समेळ यांनी पत्रव्यवहारात सांगितले असल्याचे गजानन काळे यांनी म्हटले आहे.
नाट्यगृहाच्या शौचालयातील (स्त्री/पुरुष) आरसे बदलणे, सिलिंगची दुरुस्ती करणे, पाण्याचे कुलर, नळ बदलणे इत्यादी कामांना स्थापत्य विभागामार्फत सुरुवात झाली असून कलाकारांसाठी असणार्या ग्रीन रूम्स, कलाकार निवासामध्ये नवीन गाद्या खरेदी करण्याची कार्यवाही, तसेच नाट्यगृहातील आसन व्यवस्था इत्यादी मुद्यांबाबत संबंधित विभाग प्रमुखांना सूचना देण्यात आले असल्याचे दिवाकर समेळ यांनी मनसेला लिहिलेल्या पत्राद्वारे कळविले आहे.
तर शहर अभियंते मोहन डगावकर व कार्यकारी अभियंता सुभाष सोनावणे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत त्यांनी सिव्हील कामाला सुरुवात केली असल्याचे मनसेने म्हटले आहे. तर सह शहर अभियंते जी.व्ही.राव यांच्या बरोबर झालेल्या मनसेच्या बैठकीत संपूर्ण ए.सी. प्लांट निकामी झाला असल्यामुळे तो संपूर्णपणे बदलला जाणार असून ध्वनी व्यवस्थेत ही सुधारणा करणार असल्याचे राव यांनी सांगितले असल्याचे मनसेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
विष्णुदास भावे नाट्यगृह ही नवी मुंबईतील मराठी माणसाची सांस्कृतिक ओळख असून त्यासाठी या समस्यांचा आम्ही सातत्याने पाठपुरावा करून सुसज्ज आणि निरोगी वातावरणात मराठी माय-बाप प्रेक्षकांना उत्तम कलाकृती पाहता याव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितले आहे.