पाटणा : बिहारबद्दल मी जी काही आश्वासने दिली आहेत. ती मी नक्की पूर्ण करणार असून, त्यापेक्षा जास्त काम करण्याची माझी इच्छा आहे. बिहारसाठी योग्यवेळी पॅकेजची घोषणा करण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी आज (शनिवार) बिहार दौर्यावर असून, त्यांनी पाटणा येथे विकासकामांच्या उद्घाटनावेळी हे वक्तव्य केले. यावेळी पंतप्रधानांसोबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आदी मंत्री उपस्थित होते. पाटणा-मुंबई रेल्वेला पंतप्रधानांनी हिरवा कंदील दाखविला. तर, दनियावा-बिहारशरीफ या नव्या रेल्वे मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण ज्योती योजनेचा यावेळी प्रारंभ करण्यात आला. पाटणा आयआयटी व गॅस पाईपलाईनचेही उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, की मुलमंत्र आहे. गरिबी, बेरोजगारीवर विजय मिळविण्यासाठी विकास आवश्यक आहे. देशाच्या विकासात राज्यांचा विकास खूप आवश्यक असून, राज्यांच्या विकासाशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही. राज्यातील यंत्रणांचा उपयोग विकासात होणे आवश्यक आहे. विकासविषयक कामांमध्ये राजकारणाचा किती फरक पडतो, हे बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी व्यवस्थित सांगितले आहे. अटलबिहारी वाजपेयींच्या काळात सुरू झालेल्या योजना आता पूर्ण होत आहेत. अटलजींच्या सरकारनंतर रेल्वेच्या विकासाची कामे रखडली होती. केंद्र आणि राज्य मिळून विकासाचे काम वाढवावे लागेल. आयआयटीचा अभ्यास विविध राज्यांत उपलब्ध असणे आवश्यक आहे. फक्त राजधानी दिल्लीत सर्व सुविधा मिळणे योग्य नाही. बिहारमध्ये पायाभूत सुविधा सक्षम करण्याचे काम आम्ही करणार आहोत. बिहारने आतापर्यंत देशाला अनेक रेल्वेमंत्री दिले आहेत. पण, मी बिहारमधील प्रत्येक भाग रेल्वेने जोडण्याचा प्रयत्न करणार आहे. बिहारबद्दल मी जी काही आश्वासने दिली आहेत, ती नक्की पूर्ण करणार. त्यापेक्षा जास्त कार्य करण्याचा प्रयत्न करणार आहे.