पुणे : ‘हरीने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले’ या संतोक्तीप्रमाणे सावळ्या विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने मजल-दरमजल करीत कैवल्यसम्राट संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा वेळापूरचा निरोप घेऊन पंढरीकडे मार्गस्थ झालाय.
दरम्यान, ठाकुरबुवांची समाधी इथं माऊलींच्या पालखीचं तिसरं गोल रिंगण पार पडलं. विठुरायाची पंढरी आता अगदी हाकेच्या अंतरावर आल्याने वारकर्यांचा उत्साह शिगेला पोहोचलाय आणि याचाच प्रत्यय आजच्या या रिंगणात अनुभवायला मिळाला.
तोंडले-बोंडलेतील दहीभाताच्या काल्याचा नैवेद्य घेऊन मार्गस्थ झाल्यानंतर वारकर्यांना वेध लागले ते बंधुभेटीचे. श्री माऊलींचे धाकटे बंधू श्री सोपानकाकांची पालखी वेळापूर समोरील भंडीशेगाव मुक्कामापूर्वी ‘टप्पा’ येथे येऊन श्री माऊलीस भेटते. यालाच ‘बंधुभेट’ म्हणतात.
’टप्पा’ इथं पालखीमार्गावरील सर्वात भावनिक असा संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानकाका महाराजांच्या बंधुभेटीचा अनुपम सोहळा पार पडला.. यावेळी परंपरेप्रमाणं दोन्ही पालखीतील प्रमुख, चोपदार, मानकरी यांनी दोन्ही पालख्यांचे रथ एकत्र आणले. श्रीफळांचे आदान-प्रदान केलं आणि ’माऊली, माऊली’ आणि ’विठ्ठल, विठ्ठल’ असा एकच जयघोष दुमदुमला. दोन्ही पालखीतून आलेल्या मंडळींनी गळाभेट घेतली. त्यानंतर दोन्ही पालख्या एक झाल्या. बंधुभेटीचा हा हृद सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो लोकं उपस्थित होती.