मुंबई : देशातील कंपन्यांची कमजोर तिमाही आकडेवारी आणि सुधारणांचा खोळंबा या पार्श्वभूमीवर सलग दुसर्या सत्रात होऊन शेअर बाजाराने साप्ताहिक घट नोंदवली. शुक्रवारी गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा कायम ठेवल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २५८.५३ अंकांनी घसरला आणि २८,११२.३१ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ६८.२५ अंकांची घट होऊन हा निर्देशांक ८,५२१.५५वर बंद झाला.
हे दोन्ही निर्देशांकानी सरत्या आठवडयात अनुक्रमे ३५१ आणि ८८.३० अंकांची घट दर्शवली. रुपयाचे डॉलरसमोर सुरू असलेली घसरणही बाजारासाठी मारक ठरली. याबरोबरच चीनमधील उत्पादनवाढ १५ महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचली. यामुळे बाजारावरील मळभ आणखीन वाढले. गेल्या दोन सत्रांत सेन्सेक्सने ३९२.६२ अंकांची घट झाली.
वस्तू आणि सेवाकर विधेयकासह इतर सुधारणा संसदेत अडकल्याचाही बाजारावर दबाव राहिला. ग्राहकोपयोगी वस्तू आणि एफएमसीजी या दोन निर्देशांक वगळता सर्वच निर्देशांकात घट झाली. भांडवली वस्तू निर्देशांकात १.५७ टक्क्यांची घट झाली. त्यापाठोपाठ बांधकाम क्षेत्राला फटका बसला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनाही अनुक्रमे ०.६१ टक्का आणि ०.५८ टक्क्याचा फटका बसला. सेन्सेक्समधील २१ कंपन्यांचे शेअर घसरले.