नवी मुंबई : सिडको अर्बन हाटमध्ये आयोजित करण्यात येणार्या विविध प्रदर्शनामुळे नवी मुंबईतील नागरिकांना संपूर्ण वर्षभर विविध प्रकारच्या हस्तकला आणि मानवनिर्मित वस्तूंचा अविष्कार आणि समृद्धता पाहण्याची संधी मिळते. याच अनुषंगाने सिडको अर्बन हाटमध्ये दि. १ ऑगस्ट २०१५ ते १५ ऑगस्ट २०१५ या कालावधीत राष्ट्रीय हातमाग प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. वैविध्यपूर्ण पारंपारिक हातमाग, सिल्क आणि कॉटनची उत्पादने सहजरित्या उपलब्ध व्हावीत या उद्देशाने भारत सरकारच्या हातमाग विकास आयुक्त यांच्या अंतर्गत येणार्या द असोसिएशन ऑफ कॉर्पोरेशन ण्ड एपेक्स सोसायटी ऑफ हॅण्डलूम (एसीएएसएच) यांच्यातर्फे दरवर्षी अर्बन हाटमध्ये राष्ट्रीय हातमाग प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. हे राष्ट्रीय हातमाग प्रदर्शनाचे सलग सहावे वर्ष आहे.
या प्रदर्शनात उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, राजस्थान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम बिहार, महाराष्ट्र्, पानिपत, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड व ओरिसा या राज्यातील कारागिरांनी तयार केलेले विविध हातमाग व हस्तकलेच्या उत्पादनांचे उत्कृष्ट नमुने प्रदर्शित करण्यात येणार आहेत. याशिवाय मध्य प्रदेशातील चंदेरी साड्या, वाराणसीतील बनारसी साड्या, तामिळनाडूतील कांजीवरम साड्या, बंगालमधील कांता साड्या, दक्षिणेकडील पोचमपल्ली साड्या, राजस्थानातील कोटा साड्या ग्राहकांच्या खिशाला परवडणार्या किंमतीमध्ये उपलब्ध होणार आहेत. तसेच या प्रदर्शनामध्ये टेबल, कुशन कव्हर्स, पडदे, बेडशीटस, रग आदि विविध गृहसजावटीच्या वस्तूंची विक्री करण्यात येणार आहे. संपूर्ण भारतातील कुशल विणकाम कारागिरांनी तयार केलेली खास विणकाम उत्पादने देखील या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
अर्बन हाटमध्ये २०१५-१६ या वर्षामध्ये श्रावण मेळा, गणेश मेळा, गुजरात हस्तकला महोत्सव, गांधी शिल्प बाजार, राष्ट्रीय हस्तकला बाजार, कोकण सरस, आर्ट आणि क्राफ्ट प्रदर्शन, वसंत मेळा, दीप मेळा, समर फेस्टीवल, आसाम फेस्टीवल, केरळ व्यापारी मेळा आदि प्रदर्शनांचे आयोजन करण्याचे प्रस्तावित आहे. हस्तकला व हातमाग प्रदर्शनाशिवाय, सिडकोतर्फे अर्बन हाटच्या प्रेक्षागृहात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम / कार्यशाळा व शिबिर/ प्रशिक्षण कार्यक्रम यांचे आयोजन करण्याची योजना आहे. तसेच नृत्य,नाटके, सुगम व शास्त्रीय संगीत व चित्रकला यांसारख्या कला शिकण्यासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांसाठी नवी मुंबईतील तरुण व प्रतिभावान कलाकारांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण कार्यक्रम आयोजन करण्याचे प्रस्तावित आहे. याशिवाय एखादी शाळा, महाविद्यालय, सामाजिक किंवा सांस्कृतिक संस्था प्रेक्षागृहात सांस्कृतिक कलाकृती सादर करू इच्छित असल्यास त्यांनी सिडको अर्बन हाटच्या व्यवस्थापकांशी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.
अर्बन हाटमध्ये यावर्षी केरळ, कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आसाम, गुजरात, पश्चिम बंगाल या राज्यांनी पुढाकार घेऊन, विविध प्रायोजित कार्यक्रमांचे आयोजन करणे अपेक्षित आहे. यासाठी आम्ही व्यवस्थापकीय संचालक (इतर राज्यांतील हातमाग व हस्तकला महामंडळे), सर्व विभागातील विभागीय संचालक (विकास आयुक्त हस्तकला) व खादी व ग्रामोद्योग यांना राज्यनिहाय हस्तकला महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी आमंत्रण पत्र पाठविले आहे.
आता सिडको अर्बन हाटची हातमाग व हस्तकलेची उत्पादने मिळण्याचे नवी मुंबईतील एक प्रसिद्ध ठिकाण अशी ओळख निर्माण झाली आहे. हाटमध्ये २०१० पासून ते २०१५ पर्यत ७५ पेक्षा अधिक विविध कार्यक्रमांचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले असून, यामध्ये देशातील २३ राज्यांतील सुमारे ७००० कारगीरांनी सहभागी होऊन त्यांनी तयार केलेल्या उत्पादनांची विक्री केली आहे. दरवर्षी साधारण दीड लाखापेक्षा अधिक नागरिक अर्बन हाटला भेट देतात. अर्बन हाटमधील निसर्ग सौंदर्य, आठवड्याच्या शेवटी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल व विविध राज्यातील स्वादिष्ट खाद्यपदार्थ या सर्व गोष्टी ग्राहकांना आकर्षित करत आहेत.