डेहराडून : लग्नामध्ये आवडीची हिंदी गाणी लावू न दिल्याबद्दल दारु पिऊन तर्र झालेल्या तरुणांनी वरपित्याचा गोळ्या घालून खून केल्याची धक्कादायक घटना हिमाचल प्रदेशमधील हरिद्वार जिल्ह्यात घडली.
या मद्यधुंद तरुणांनी नाचायची इच्छा असल्याने लग्नाच्या ठिकाणी असलेल्या डीजेला आणखी गाणी लावण्यास सांगितले. मात्र विश्वास राम या वरपित्याने या प्रकरणी हस्तक्षेप करत मध्यरात्र उलटून गेली असल्याने व लग्नाचे विधी पूर्ण करावयाचे असल्याने गाणी बंद करण्यास सांगितले. यावरुन राम व तरुणांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.
या तरुणांपैकी एकाने खिशातून पिस्तूल काढून ते डीजेवर रोखत त्याला गाणी लावण्यास सांगितले. संघर्ष वाढत जाऊन राम यांनी या तरुणांना तत्काळ निघून जाण्यास सांगितले. यावर आपला अपमान झाल्याचे वाटून यांमधील एका तरुणाने राम यांच्यावर गोळ्या झाडल्या. या अनपेक्षित घटनेने हादरलेल्या गावकर्यांनी या तरुणांना बेदम मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केले.