मुंबई : मुंबईमध्ये 1993 मध्ये झालेल्या साखली स्फोटातील आरोपी याकूब मेमनचे समर्थन करणारा प्रत्येक जण देशाचा शत्रू आहे, अशा शब्दांत योगगुरू रामदेव बाबा यांनी सलमान खान याच्या वक्तव्यावर टीका केली आहे.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने आज (रविवार) ट्विटरद्वारे मुंबई स्फोटातील प्रमुख आरोपी टायगर मेमनच्या गुन्ह्याची शिक्षा त्याचा भाऊ याकूबला का देण्यात येत आहे असा सवाल उपस्थित केला आहे. त्याच्या या ट्विटवर देशभरातून टीका व्यक्त करण्यात येत आहे. योगगुरू रामदेव बाबा यांनी मेमनचे समर्थन करणारा प्रत्येक जण देशाचा शत्रू असल्याचे म्हटले आहे. तर सातारा येथे सलमानच्या बजरंगी भाईजान या चित्रपटाच्या पोस्टरला काळे फासण्यात आले.
सलमानचे वडिल सलीम खान यांनीही आपल्या पुत्राच्या वक्तव्याचा निषेध केला असून ज्या गोष्टीबाबत आपल्याला काही माहिती नाही त्याबाबत वक्तव्य करू नये, असे मी सलमानला समजावून सांगेल, असे म्हटले आहे. तर उज्ज्वल निकम यांनी सलमानचे वक्तव्य आक्षेपार्ह असून आपले वक्तव्य मागे घेऊन त्याने माफी मागावी अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशारा दिला आहे.