नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानमध्ये पुढच्या काही महिन्यांमध्ये पुन्हा क्रिकेट पर्व सुरु होण्याची शक्यता बीसीसीआयने फेटाळून लावली आहे.
गुरदासपूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी भारत-पाकिस्तानमध्ये लगेचच क्रिकेट संबंध सुरळीत होणार नसल्याचे स्पष्ट केले.
सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानसोबत क्रिकेट संबंध जोडणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारी सकाळी पंजाबच्या गुरदासपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीमेपलीकडच्या अतिरेक्यांचा संबंध असण्याची दाट शक्यता आहे.
यापूर्वीही मालिका खेळवण्याचा कोणताही निर्णय झाला नव्हता फक्त पीसीबीने बीसीसीआयला आपला प्रस्ताव दिला होता. आमची चर्चा सुरु होती. पण जेव्हा असा दहशतवादी हल्ला होता. आधी जम्मूमध्ये आता पंजाबमध्ये या हल्ल्यांमध्ये निष्पाप भारतीयांचा बळी जात आहे. या परिस्थिती एक भारतीय म्हणून पाकिस्तानसोबत क्रिकेट शक्य नाही असे मला वाटते असे ठाकूर यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले.
क्रिकेटच्या मैदानावर जाण्यापूर्वी दोन्ही देशांची क्रिकेट मंडळे आणि दोन्ही देशांमध्ये जे मुद्दे आहेत त्यावर तोडगा निघाला पाहिजे. जर हे मुद्दे सोडवले नाहीत तर क्रिकेट सुरु होऊ शकत नाही असे ठाकूर म्हणाले.
पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांनी यावर्षी कोलकात्यामध्ये येऊन बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी डिसेंबर महिन्यात त्रयस्थ ठिकाणी म्हणजे यूएईमध्ये तीन कसोटी, पाच एकदिवसीय आणि दोन टी-20 सामने खेळवण्याचा प्रस्ताव दिला होता. 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानसोबत कुठलीही कसोटी मालिका खेळलेला नाही.