मेळाव्यात ३८०० उमेदवारांचा सहभाग
नवी मुंबई : जीवनधारा वॉर्ड सल्लागार समिती रोजगार, व्यापार आणि उद्योगाच्या वतीने आयोजित करण्यात येणार्या रोजगार मेळाव्यांमधून बेरोजगार तरुण आणि तरुणींना रोजगार प्राप्ती होते, असे गौरवोद्गार लोकनेते गणेश नाईक यांनी काढले आहेत. जीवनधाराच्या माध्यमातून पाचवा भव्य रोजगार मेळावा शनिवारी पार पडला. आ. संदीप नाईक यांच्या माध्यमातून या उपक्रमाचे गेली ५ वर्षे सातत्याने आयोजन होत असल्याबद्दल लोकनेते नाईक यांनी आ. संदीप नाईक यांचे कौतूक केले. ऐरोलीच्या हेगडे भवन येथे पार पडलेल्या या मेळाव्यामध्ये सुमारे ३ हजार ८०० उमेदवारांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी १ हजार ८५२ उमेदवारांची निवड करण्यात आली. या मेळाव्यात ६५ कंपन्यांनी सहभाग घेतला.
लोकनेते गणेश नाईक यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन मेळाव्याचे उद्घाटन झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक, मेळाव्याचे आयोजक आ. संदीप नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, माजी महापौर सागर नाईक, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अनंत सुतार, नगरसेवक आणि नगरसेविका वर्ग, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते-पदाधिकारी, जीवनधारा समित्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकनेते गणेश नाईक यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात उपस्थित तरुणांची उमेद वाढवत बेरोजगारीमुळे खचून जाऊ नका, असा सल्ला दिला. प्रयत्न करुनही अनेक वेळा पदरामध्ये निराशा पडते. परंतु, कठीण काळानंतर यशाची प्राप्ती होतेच, असा आशावाद त्यांनी मांडला. लोकसंख्या वाढीमुळे नोकर्या मिळणे कठीण झाले असले तरी जोपर्यंत या मेळाव्यामध्ये सहभागी उमेदवारांना रोजगार प्राप्ती होत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहून शेवटपर्यंत त्यांना साथ देऊ, अशी ग्वाही त्यांनी उपस्थित उमेदवारांना दिली.
मेळाव्याचे आयोजक आ. संदीप नाईक यांनी प्रास्ताविक केले. लोकनेते गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या जीवनधारा वॉर्ड सल्लागार समिती रोजगार, व्यापार आणि उद्योगच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार प्राप्तीसाठी सहकार्य करण्याचे भाग्य मिळाले, याबद्दल समाधान व्यक्त केले. बेरोजगार उमेदवारांच्या गरजानुसार रोजगार मेळाव्याच्या स्वरुपात आवश्यक बदल केले. आजमितीस जीवनधाराच्या जॉब असिस्ट सेंटरमध्ये विविध क्षेत्रातील १२०० कंपन्यांनी नोंदणी केली असून ६०० कंपन्यांनी त्यांना आवश्यक मनुष्यबळाची मागणी नोंदवली आहे, अशी माहिती दिली. या नोंदणीकृत कंपन्यांमधून बेरोजगार उमेदवारांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. अनुभव नाही म्हणून नोकरी नाही, आणि नोकरी नाही म्हणून अनुभव नाही, अशी बेरोजगार तरुणांची स्थिती असते. जीवनधाराच्या रोजगार मेळाव्यांमधून नोकरी प्राप्त झाल्यानंतर उमेदवारांना कामाचा अनुभव मिळतो आणि एकदा का अनुभव मिळाला की आपोआप नोकरीही मिळते. त्यामुळे जीवनधाराचे मेळावे बेरोजगार उमेदवारांसाठी एक प्रकारे लिफ्ट देण्याचे काम करीत आहेत. रोजगार मेळाव्याप्रमाणेच उद्योजक घडविणारा मेळावा भरविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. कामगार क्षेत्रात काम करीत असताना लोकनेते गणेश नाईक आणि डॉ. संजीव गणेश नाईक यांनी असंख्य लोकांना नोकर्या मिळवून दिल्या. त्याचप्रमाणे उद्योगधंदे देखील टिकवले, असे आ. नाईक म्हणाले. पुढचा रोजगार मेळावा वाशी येथे भरविण्यात येईल, अशी घोषणा केली.
संजीव नाईक यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये आ. संदीप नाईक यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. लोकनेते गणेश नाईक यांनी कामगार नेते म्हणून नवी मुंबईतील एमआयडीसीमध्ये स्थानिक आणि इतर सर्व घटकांना नोकरी मिळवून देण्याकरीता केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. लोकनेते गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईमध्ये रोजगार निर्मितीसाठी करीत असलेल्या पाठपुराव्याची माहिती नाईक यांनी उपस्थितांना दिली. आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनएपीटीचे नवे पोर्ट, रिलायन्स कंपनीची फोर जी सेवा, वाहन उद्योगातील नामांकित कंपन्यांचे प्रकल्प, मेट्रो रेल्वे, मुंबई स्टॉक एक्सेंज आदी भविष्यातील प्रकल्पांमुळे नवी मुंबईत रोजगारांच्या हजारो संधी निर्माण होणार आहेत, असे ते म्हणाले, जीवनधाराच्य माध्यमातून वर्षभर कार्यरत जॉब असिस्ट सेंटर आहे. त्याचबरोबर सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन विकसित करण्याची सूचना त्यांनी केली. देशातील स्मार्ट सिटीसाठी केंद्र सरकारने नवी मुंबईची निवड केली असून देशातील पहिली स्मार्ट सिटी बनण्याची क्षमता नवी मुंबईत असल्याचा विश्वास डॉ. नाईक यांनी व्यक्त केला.
***रोजगार मेळाव्याचा अभिमान
आ. संदीप नाईक यांनी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यामध्ये मी पहिल्यांदाच सहभाग घेतला आणि पहिल्याच प्रयत्नात मला सुरक्षा रक्षकाची नोकरी मिळाली आहे. माझी आई घरकाम करते आणि वडील कष्टकरी आहेत. मला नोकरीची खूप गरज होती. नोकरी मेळाव्यात मिळाल्याने आमच्या कुटुंबाला आधार मिळाला आहे.
– निलेश तानाजी इंगवले, विजयनगर, दिघा
*** लोकनेते गणेश नाईक आणि संदीप नाईक यांनी रोजगार मेळावा भरविला असल्याचे होर्डींग वाचून समजले. माझ्या कुटुंबाची परिस्थिती अशी आहे की, मी एक दिवस देखील नोकरीशिवाय घरी बसू शकत नाही. या मेळाव्यामध्ये नोकरी मिळविण्यासाठी पहिल्यांदाच मोठ्या आशेने आले आणि मला एका मोठ्या ब्यूटी पार्लरमध्ये सहाय्यकाची नोकरी मिळाली आहे.
– भाग्यश्री गोस्वामी, दिघा
*** रोजगार मेळाव्याने दिली संधी
अनेक ठिकाणी मी नोकरी मिळावी यासाठी अर्ज केला होता. आयटी अभ्यासक्रम पुर्ण होऊन सुध्दा मला नोकरी मिळत नव्हती. मागील सहा महिन्यापासून नोकरीच्या शोधात असताना ऐरोलीतील या रोजगार मेळाव्यात मला नामाकिंत आयटी कंपनीत नोकरी मिळाली आहे. माझ्या घरच्यांना याची माहिती दिली आणि त्यांनी आयोजकांचे आभार मानले.
-सागर चंदने, म्हापे.
*** रोजगाराची माहिती देणारा उपक्रम
एक सर्वसामान्य घरातील मुलांना नोकरी शोधताना अनेक अडचणींचा सामना करायला लागतो. या रोजगार मेळाव्यातून मला एक नाही तर अनेक कंपन्यांची माहिती मिळाली आहे. लोकनेते गणेश नाईक, आ.संदीप नाईक यांनी युवा वर्गासाठी हा चांगला उपक्रम सुरु केला आहे त्याबद्ल मी त्यांचे आभार मानते.
– सुप्रिया कोलते, नेरुळ.
*** आत्मविश्वास वाढला
माझे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी मी अनेक ठिकाणी प्रयत्न केले. मात्र ऐरोलीतील रोजगार मेळाव्यात आल्यानंतर मला अर्ज कसा भरायचा, मुलाखत कशी द्यायची अशा विविध गोष्टीची माहिती मिळाली. चांगली नोकरी मिळाली याचा आनंद तर आहेच पण त्यापेक्षा माझा कौन्सिलींगमधूम आत्मविश्वास वाढला आहे.
मेघना साइल, ऐरोली.