शिर्डी ग्रामस्थांच्या विरोधापुढे साई संस्थान नमले
शिर्डी : नाशिक सिंहस्थ पर्वणीचा मुद्दा पुढे करत साई संस्थानाच्या प्रशासनाने पहाटेची आणि रात्रीची काकड आरती यांच्या वेळेत बदल केला होता. या बदललेल्या वेळांना स्थानिक ग्रामस्थांनी जोरदार विरोध केल्याने साई संस्थान प्रशासनाला अखेर नमते घ्यावे लागले. साई मंदिराच्या सर्व आरत्या पूर्वीच्याच वेळेप्रमाणे होतील. नवीन बदललेला निर्णय स्थगित करण्यात आल्याचे प्रशासनाने जाहीर केले.
साई मंदिरात रोज पहाटे 4.30 काकडा आरती, दुपारी 12 वा. मध्यान्ह आरती, सायं सूर्यास्तावेळी धूप आरती, रात्री 10 वा. शेज आरती होते. या आरत्या कित्येक वर्षापासून सुरू आहेत. मात्र संस्थानाच्या त्रिसदस्यीय समितीने त्यात बदल करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी घेतला. पहाटेची काकडआरती 4.30 ऐवजी 3 वा; तर रात्रीची 10 ची आरती 11.30 वा. करण्याचा निर्णय घेतला होता. या बदलेल्या वेळांमुळे भाविक नाराज झाले होते. या वेळा त्यांना सोयीच्या नव्हत्या. संस्थानच्या या निर्णयाला शिर्डी ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. शिर्डीचे नगराध्यक्ष कैलास बापू कोते, प्रमोद गोंदकर, नितीन कोते, विजय कोते व सर्व ग्रामस्थांनी संस्थान प्रशासनाला शनिवारी निवेदन देवून साई मंदिराच्या आरत्या पूर्वीच्या वेळेप्रमाणेच व्हाव्यात, अशी मागणी केली. दरम्यान ग्रामस्थांच्या या भावना कैलास बापू कोते यांनी राधाकृष्ण विखे यांच्या कानी घातल्या. विखे यांनी दुपारी 4 वा. नगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे व संस्थानचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश मिनय जोशी यांना फोन करुन चर्चा केली व आरत्यांच्या वेळात बदकल करु नये असे सांगितले. त्यांनतर कलेक्टर आणि जिल्हा न्यायधीशांनी या निर्णयाला स्थगिती दिली.
दरम्यान शिर्डी ग्रामस्थ व संस्थान एकत्र बसून या वर अंतिम निर्णय दिला जाईल, असे या चर्चेत ठरले. 2 ते 3 दिवसांत साई संस्थान ग्रामस्थांनी बैठल घेणार अशी माहिती कैलास बापू कोते यांनी दिली. स्थानिक ग्रामस्थ व विखे यांच्या एकत्रित दबावामुळे आम्हाला यश मिळाले असे कोते यांनी सांगितले.