पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात खंडाळा बोगद्याजवळ शनिवारी दुपारी पुन्हा दरड कोसळण्याची घटना घडल्याने आजही (रविवार) द्रुतगती मार्गावरील वाहतूक विस्कळीतच असल्याचे चित्र आहे. आज सकाळी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी परदेशी तंत्रज्ञानाच्या मदतीने जिओलॉजिकल सर्वे करण्यात आल्याचे सांगितले. धोकादायक दरडी पाडण्याचे काम सुरू असल्यामुळे दरडींचा धोका कायम असल्याने प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालूनच प्रवास करावा लागत आहे.
खंडाळा बोगद्याजवळ 22 जून रोजी दरड कोसळली होती. त्याच ठिकाणी शनिवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहतुकीची कोंडी झाली होती. एक मार्गानेच वाहनांची ये-जा सुरू असल्याने आज सुटीच्या दिवशी वाहतूक विस्कळीत झाली होती. गेल्या महिन्यात खंडाळा बोगद्यासह आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळून दोघांचा मृत्यू झाला होता, तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या होत्या.