सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : समाजासाठी झोकून देऊन काम करणार्या माणसांच्या कामाची दखल समाजाने कृतज्ञतेने घ्यायला हवी तरच समाजाची सर्वांगीण प्रगती होऊ शकते. असे निकोप वातावरण नवी मुंबईत आहे यामुळेच नवी मुंबईची गतीमान प्रगती होताना दिसत आहे याबद्दल समाधान व्यक्त करीत लोकनेते गणेश नाईक यांनी नवी मुंबई हे अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण शहर आहेच त्यासोबतच ते गुणवंतांचा सन्मान करणारे शहर आहे याचा मला अभिमान वाटतो अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
सुधाकर सोनवणे हे महापौर म्हणजे शहराचा प्रथम नागरिक असे अतिशय मानाचे पद भूषवित असूनही आजही सर्वसामान्य माणसांमध्ये त्यांचा बनून राहतात हे त्यांच्या स्वभावाचे मोठेपण असून जो दुसर्यांचा सन्मान करतो तो आपोआपच सर्वांच्या सन्मानास पात्र होतो. त्यामुळे आजचा हा गौरव समारंभ शहराची सांस्कृतिक उंची वाढविणारा आहे असे ते म्हणाले.
मातोश्री अनुसया सोनवणे चॅरिटेबल ट्रस्ट, नवी मुंबई यांच्या वतीने ऐरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार संदीप गणेश नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विष्णुदास भावे नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या समाजदीप या कार्यक्रमाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी खासदार संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, कार्यक्रमाचे आयोजक संस्थेचे अध्यक्ष तथा नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे, उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समितीच्या सभापती सौ. नेत्रा शिर्के, सभागृहनेते जयवंत सुतार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, नगरसेवक डॉ. जयाजी नाथ यांचे समवेत सुप्रसिध्द अभिनेत्री प्रेमा किरण, सुनिल गोडबोले, जयराज नायर, राहुल पाटील, अंशुमाला पाटील, जगदिश पाटील असे नाट्य, चित्रपट, गायन क्षेत्रातले दिग्गज कलावंत व नगरसेवक – नगरसेविका आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार संदीप नाईक यांनी आपला वाढदिवस साजरा करताना नवी मुंबईतील विविध क्षेत्रात समर्पित भावनेने काम करणार्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार आयोजित करुन मला वाढदिवसाची अनमोल भेट दिली असल्याचे सांगितले.
माजी खासदार संजीव नाईक यांनी अशा प्रकारे गुणवंतांचा सन्मान म्हणजे समाजाने या व्यक्तींच्या कार्याबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता आहे असे सांगत यामधून नव्या पिढीला प्रेरणा मिळत राहील असा विश्वास व्यक्त केला.
समाजदीप कार्यक्रमांतर्गत नवी मुंबईतील विविध क्षेत्रात कार्यरत असणार्या कर्तबगार व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार देऊन लोकनेते श्री. गणेश नाईक यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. योग क्षेत्रासाठीचा समाजभूषण पुरस्कार ऋषितुल्य व्यक्तीमत्व पद्मश्री सदाशिव निंबाळकर यांना तसेच विद्या उत्कर्ष मंडळ, बेलापूर (शैक्षणिक क्षेत्र), हंसाराम बुवा पाटील (पारंपारिक कला क्षेत्र), अॅड. पी.सी. पाटील व सौ. जयश्री पाटील (सामाजिक क्षेत्र), डॉ. हणमंतराव पाटील (वैद्यकीय क्षेत्र), श्रीम. शोभा मुर्ती (महिला व बाल विकास क्षेत्र), विनोद पुन्शी (पर्यावरण क्षेत्र), साहेबराव ठाणगे (साहित्य क्षेत्र), बी.बी. नायक (क्रीडा क्षेत्र), विवेक भगत (नाट्यकला क्षेत्र) अशा 10 मान्यवरांना समाजभूषण पुरस्कारांनी गौरविण्यात आले.