राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांचा सत्ताधार्यांना खडा सवाल
मुंबई : केवळ आश्वासने देऊन फुकटची प्रसिद्धी लाटण्याचा खेळ आता सत्ताधार्यांनी बंद करावा, दिलेल्या आश्वासनांच्या पुर्ततेचे काय झाले? असा खडा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी सत्ताधार्यांना केला आहे. आज वरळी येथील बाबासाहेब गावडे शाळेला भेट देऊन शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी अश्वासन दिल्याप्रमाणे मुलांच्या दप्तरांचे ओझे खरेच कमी झाले आहे का ? याची तपासणी केली. या तपासणीत धक्कादायक वास्तव समोर आले, मुलांच्या पाठिवरच्या दप्तरांचे ओझे तसूभरही कमी झालेले नाही, मात्र त्या माध्यमातून आठ महिन्यांपुर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी मात्र आपला ‘पब्लिसिटी स्टंट’ उरकून फुकटची प्रसिद्धी मिळवल्याची घणाघाती टीका मा. अहिर यांनी केली.
गेल्या वर्षी सत्तेवर आल्यानंतर लगेचच भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी वारेमाप आश्वासने देण्याचा धडाका लावला होता. आपण किती काम करतो याचा दिखावा करण्यात सत्ताधारी मंत्र्यांमध्ये जणु स्पर्धाच लागली होती. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी एका शाळेत जाऊन विद्यार्थ्यांच्या पाठिवरचे दप्तराचे वजन करण्याचा एक ‘प्रसिद्धी सोहळा’ पार पाडला हाता. आणि माध्यमांसमोर मुलांच्या पाठिवरचे दप्तरांचे ओझे कमी करण्याचा सरकार प्रयत्न करेल असे आश्वासनही दिले. मात्र आज या आश्वासनाला आठ महिने उलटून गेले तरीही मुलांच्या पाठिवरच्या दप्तरांचे ओझे कमी झाले नाहीच, मात्र तावडेंच्या आश्वासनांचे ओझे मात्र ‘जड’ झाल्याचा टोला मा. सचिन अहिर यांनी लगावला. आजही विद्यार्थी सात ते आठ किलोचे दप्तर आपल्या पाठीवरून घेऊन शाळेत जातात त्यामुळे त्यांना पाठीचे तसेच खांद्याचे विविध आजार होत असल्याची बाब समोर येत असल्याचेही ते म्हणाले.
या मु्द्यावरून सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेतही वेगवेगळ्या भुमिका पाहायला मिळत असल्याचे सांगत शिवसेनेच्या टॅब योजनेवरही त्यांनी टीका केली. खरोखरच दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिवसेना ही योजना आणते आहे की,टॅब कंपनीचे उखळ पांढरे करण्यासाठी ही योजना आणली जात आहे असा प्रश्न अहिर यांनी यावेळी उपस्थित केला. या टॅबची खरेदी कोणत्या कंपनीकडून केली जाणार आहे हे तपासण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली