संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई ः गाजावाजा करून बांधण्यात आलेल्या पामबीच मार्गावरील नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांना कामकाज करण्याकरीता कार्यालयच नसल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे या विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळेवर कोणी कार्यालय देता का कार्यालय असे म्हणण्याची पाळी आली आहे. अतिक्रमणाने बकाल होत चाललेल्या या नवी मुंबई शहराच्या मनपा अतिक्रमण उपायुक्तांच्या कार्यालयावर अन्य घटकांचे कामकाज सुरू झाल्याने मनपा मुख्यालयात हा चर्चेचा विषय बनला आहे.
बेलापूर सेक्टर-15 ए मधील नवी मुंबई महापालिका मुख्यालयातील महापालिका उपायुक्त (अतिक्रमण विभाग) सुभाष इंगळे यांचे दालन अचानक अन्य विभागाच्या नवीन उपायुक्तांना दिल्याने सुभाष इंगळे यांच्यावर दुर्दैवाने महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या दालनातून कारभार करण्याची वेळ आली आहे.
नवी मुंबई महापालिकेने तब्बल 250 कोटी रुपये खर्चून पामबीच मार्गालगतच बेलापुर किल्ले गावठाण चौकात भव्य महापालिका मुख्यालय इमारत निर्माण केली असली, तरी सध्या महापालिकेचे सर्व विभाग पूर्णपणे एकाच छताखाली आणण्यास अद्यापही महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांना यश आले नसल्याचे आजही उघडपणे पहावयास मिळत आहे. महापालिका मुख्यालयात जागा न मिळाल्याने अजुनही एलबीटी विभागाचा काही कारभार कोपरखैराणे येथील जुन्याच कार्यालयातून चालविला जात आहे. त्यामुळे या विभागाचे उपायुक्त उमेश वाघ यांचा बराचसा वेळ कोपरखैरणे येथे व्यतित होत आहे. मात्र, उमेश वाघ यांना नवीन महापालिका मुख्यालयाच्या इमारतीत स्वतंत्र दालन देण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी त्यांचा काही कर्मचारी वर्ग देखील आहे.
उपायुक्त सुभाष इंगळे आणि सुरेश पाटील महापालिका अतिक्रमण उपायुक्तांच्या दालनावर अन्य विभागाचे अतिक्रमण यांच्याकडे एक आणि दोन या परिमंडळाचा कार्यभार असल्याने त्यांना मुख्यालयात बैठकीला यावे लागते. त्यामुळे सुभाष इंगळे आणि सुरेश पाटील यांना महापालिका मुख्यालयातील तळ मजल्यावर संयुक्त दालन देण्यात आले होते. याच ठिकाणी उपायुक्त सुरेश इंगळे उपायुक्त अतिक्रमण म्हणूनही कामकाज करण्याची वेळ आली आहे.
अतिक्रमण संवेदनशील विषय असल्याने अतिक्रमण विभागाचा सर्व कर्मचारी वर्ग सुरुवातीपासूनच महापालिका मुख्यालयात आहे. सध्या अतिक्रमण विभाग मुंबई उच्च न्यायालयाच्या हिटलिस्टवर असल्याने सतत विविध याचिकेच्या सुनावण्या सुरु आहेत. त्यासाठीचा पत्रव्यवहार करणे आणि अन्य कामांमुळे उपायुक्त सुभाष इंगळे यांना सतत संबंधित कर्मचार्यांची आवश्यकता लागत असल्याने त्यांना महापालिका मुख्यालयात ये-जा करावी लागत आहे. सध्या इंगळे यांचे दालन अचानकपणे नवीन उपायुक्त सौ. तृप्ती सांडभोर यांना देण्यात आल्याने मुख्यालयात आल्यावर इंगळे यांना अतिरिक्त आयुक्तांच्या दालनातून अतिक्रमण विभागाचा कारभार हाकावा लागत आहे. त्याचप्रमाणे इतरही अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागत असल्याने जिथे अतिक्रमण उपायुक्तांच्याच दालनावर अतिक्रमण झाले तेथे नवी मुंबई शहरात होत असलेल्या अतिक्रमणांना सुभाष इंगळे कसे सामोरे जाणार?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिका आयुक्त दिनेश वाघमारेंनी याप्रकरणी उपायुक्त सुभाष इंगळे यांना कार्यालय देवून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे.