मुंबई : अमेरिकेच्या व्याजदर धोरणावर आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचे भाव अवलंबून असतील. यासाठी येत्या सप्टेंबरमध्ये होणारी फेडरल रिझव्र्हची बैठक महत्त्वाची आहे. याबरोबरच चीनमधील आर्थिक मंदी ही भारतातील सोन्याचे भाव अस्थिर होण्यास कारणीभूत ठरत आहे. या स्थितीत सोन्याचा भाव प्रति तोळा 22,500 रुपयांच्या खाली घसरल्यास येत्या सहा ते बारा महिन्यांच्या कालावधीत त्या 20 हजार रुपयांवर घसरतील, असा अंदाज बुलियन बुलेटिनच्या संशोधन अहवालात वर्तवण्यात आला आहे.
दक्षिण आशियातील सर्वात मोठी वार्षिक परिषद असलेल्या 12व्या भारतीय आंतरराष्ट्रीय सुवर्ण संमेलनाची घोषणा बुधवारी करण्यात आली. 21 आणि 13 ऑगस्टला गोव्यात ही परिषद होणार आहे. चीननंतर सोने आयातीत दुसर्या क्रमांकावर असलेल्या भारतात ही आयात कमी करण्यासाठी सरकारकडून सुवर्णठेव योजना आणि सोने चलनीकरण योजना लागू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. घरोघरी पडून असलेले सोने व्यवहारात आणण्यासाठी या योजना उपयुक्त ठरणार असल्याचे सरकार आणि स्विस मेटल रिफायनरीचा संयुक्त उद्यम असलेल्या एमएमटीसी प्याम्प इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खोसला यांनी स्पष्ट केले.
सोन्याची आयात 28 अब्ज डॉलरवर घसरणार
जागतिक स्तरावर सोन्याचे घसरणारे भाव पाहता चालू आर्थिक वर्षात भारतात होणार्या या धातूच्या आयातीचे मूल्य 18 टक्क्यांनी घटून 28 अब्ज डॉलरवर घसरण्याची शक्यता खोसला यांनी वर्तवली. सोन्याच्या टनांमधील आयातीत मात्र वाढ होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. जुलैच्या शेवटी सोन्याच्या किमती 1077 डॉलर प्रति औंसावर घसरल्या होत्या. येत्या काही महिन्यांमध्ये फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीच्या शक्यतेनेदत्या 1000 डॉलरवर घसरू शकतात.