नाशिक : कर्ज आणि दुष्काळी परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या नाशिक जिल्ह्यातील दोन शेतकर्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. बागलाण तालुक्यातील कोटबेल येथील भाऊसाहेब रंभा साबळे (35) यांनी गळफास घेऊन तर चांदवड तालुक्यात काळखोडे येथील शेतकरी रामभाऊ भास्कर शेळके (40) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
कोटबेल येथील भाऊसाहेब साबळे यांच्या डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातच वारंवार दुष्काळ पडत असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट बनला होता. बँक तसेच अन्य लोकांकडून घेतलेल्या कर्जाचा बोजाही वाढल्याने काही दिवसांपासून त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याने ते वैफल्यग्रस्त झाले होते. अखेर 3 ऑगस्टला रात्री घरातच त्यांनी दोरखंडाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
काळखोडे येथील शेतकरी रामभाऊ शेळके ही दुष्काळी परिस्थितीने कर्जबाजारी झाले होते. कर्जाला कंटाळून त्यांनी सोमवारी रात्री विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर सोसायटीचे 1 लाख 18 हजार व इतर हातउसने तीन ते साडेतीन लाखाचे कर्ज होते. यंदा पाऊस न झाल्याने व मुलीच्या लग्नाचीही त्यांना चिंता होती. चांदवड पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.