नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या धाडीत 86 लाख 85 हजारांचा विदेशी मद्यसाठा सापळा रचून हस्तगत केला. मच्छी वाहतूक करणार्या वातानुकूलीत कंटेनरमधून हा साठा नेत असताना दोन संशयितांना गुरुवारी ताब्यात घेतले.
प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास मुंबईकडे मच्छी घेऊन जाणारा वातानुकूलित कंटेनरची (केएच 20 जे 6327) पथकाने तपासणी केली. त्यात मच्छीचे 45 कॅरेट आढळून आले. मच्छीचा उग्र वास येत असल्याने पथकाने चालकाची चौकशी करून कंटेनर सोडून दिला. मात्र, पथकाचे उपनिरीक्षक दिगंबर शेवाळे यांनी संशय आला. जवानांना पुन्हा कंटेनरमधील सर्व कॅरेट बाहेर काढण्यास सांगितले. त्या वेळी माशांच्या बॉक्समागे ठेवलेले विदेशी मद्याचे सुमारे 1200 बॉक्स आढळून आले. कंटेनर, माशांसह संपूर्ण साठा 86 लाख 85 हजारांचा आहे. चालक शमीरबाबू अहमद कुटी, पी. शाहिद हजमा हे दोघेही संशयित चेन्नईचे आहेत. दोघेही तामिळ बोलत असल्याने पथकास तपास करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. भरारी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक मुकुंद बिलोलीकर पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.