कोलकाता : मंत्र्याचे स्वागत करण्यास नकार दिला म्हणून तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एका विद्यार्थ्याला केलेल्या जबर मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेच्या निषेधार्थ डावे पक्ष आणि कॉंग्रेसने राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे.
कृष्णा प्रसाद जन असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. पश्चिम मिदनापूरच्या संबगमध्ये मंत्री सौमेन महापात्रा गेले होते. तेथील कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मंत्र्याचे स्वागत करण्यास सांगण्यात आले मात्र कृष्णा प्रसाद याने त्यास नकार दिला. त्यामुळे तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली आणि यात त्याचा मृत्यू झाला.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याघटनेप्रकरणी शोक व्यक्त केला आहे. मात्र याप्रकरणी तृणमूल विद्यार्थ्यी परिषेदवर करण्यात आलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत. तर या घटनेसाठी कॉंग्रेसच्या विद्यार्थ्यी परिषदेला जबाबदार धरले आहे. शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांनीही या घटनेप्रकरणी दु:ख व्यक्त केले.