यादीत कर्नाटकातील मैसूर शहर अव्वल स्थानी आहे.
नवी मुंबई : स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई शहराने तिसरे स्थान मिळवले आहे. तर यादीत कर्नाटकातील मैसूर शहर अव्वल स्थानी आहे.
केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाने ही यादी जाहीर केली आहे. सर्वेक्षण करण्यात आलेल्या एकूण ४७६ शहरांपैकी मैसूर हे शहर स्वच्छ शहरांच्या यादीत अव्वल आहे तर बंगळूरु सर्वात स्वच्छ राजधानीचे शहर आहे.
स्वच्छ शहरांच्या यादीतील पहिल्या १० शहरांमध्ये कर्नाटकातील तीन शहरांचा समावेश आहे. तर टॉप १०० शहरांमध्ये पश्चिम बंगालमधील २५ शहरांचा समावेश आहे.
या यादीत दक्षिणेकडील शहरांचे प्रमाण अधिक आहे. टॉप १०० च्या यादीत दक्षिणेकडील ३९ शहरांनी स्थान मिळवले आहे. तर पूर्वेकडील २७, पश्चिम भागातील १५ आणि उत्तरेकडील १२ शहरांचा समावेश आहे. ईशान्येकडील सात शहरांनी पहिल्या १०० च्या यादीत स्थान मिळवले आहे.
टॉप १० मध्ये पहिल्या स्थानी मैसूर, त्यानंतर तिरुचिरापल्ली(तामिळनाडू), नवी मुंबई, कोची(केरळ), हसन, मंड्या आणि बंगळूरु(कोलकाता), तिरुअनंतपुरम(केरळ), हलिसहार(पश्चिम बंगाल) आणि गंगटोक(सिक्कीम) यांचा समावेश आहे. मध्य प्रदेशातील दामोह हे शहर या यादीत सर्वात शेवटच्या स्थानी आहे.