औरंगाबाद : औरंगाबाद…शनिवारी रात्री २ वाजता
देवच आपला न्याय करेल. असं म्हणणार्या या राधे मॉं सध्या वादाच्या भोवर्यात अडकल्यात. आक्षेपार्ह कपडे घालणं, भक्तांसोबत भयानक अंगविक्षेप करून नाचणं या वादाच्या जोडीलाच आता हुंड्यासाठी दबाव आणण्याच्या गुन्ह्यातही त्यांचं नाव पुढे आलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी औरंगाबादमध्ये त्यांनी केलेली ड्रामेबाजी खचितच मनोरंजक आहे. त्याचं घडलं असं.
*** मुंबई. शुक्रवारी सकाळी ९ वाजता
वादामध्ये अडकलेल्या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू राधे मॉं यांच्या विरोधात आदल्या दिवशी एका हुंड्याच्या प्रकरणात एफआयआर दाखल झाली आणि सुरू झाला त्यांचा शोध. राधे मॉं कुठे आहेत? त्या देशात आहेत की परदेशी गेल्यात? त्या फरार आहेत का? अशी चर्चा मीडियामध्ये सुरू झाली… आश्चर्य म्हणजे पोलिसांनाही त्या नेमक्या कुठे आहेत, हे माहित नव्हतं…
***औरंगाबाद…दुपारी १२ वाजता
राधे मॉं औरंगाबादच्या मिडोज या अलिशान हॉटेलमध्ये असल्याची माहिती मीडियाला मिळाली… तिथं त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आम्ही अनेकदा त्यांच्या भक्तांना विनंती केली… मात्र राधे मॉं काही आम्हाला दर्शन द्यायला तयार नव्हत्या..
** औरंगाबाद…दुपारी २ वाजता
औरंगाबाद क्राईम ब्रँचचे साध्या वेशातले पोलीस हॉटेल मिडोजमध्ये दाखल झाले आणि नंतर सगळ्या मीडियाचं लक्ष इकडे वेधलं गेलं. हळूहळू सर्वच प्रमुख वाहिन्या आणि वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी इथं जमले. पोलिसांनी सुमारे २-अडीच तास राधे मॉंची चौकशी केली. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशी सुरू असून अटक करण्याची गरज नसल्याचं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं. त्यामुळे पोलीस कोणतीच ठोस कारवाई न करता परत गेले.
** औरंगाबाद. रात्री ११ वाजता
राधे मॉं अखेर मीडियाशी बोलणार असल्याचं त्यांच्या भक्तांनी सांगितलं. मात्र त्यानंतर तब्बल आडीच तास उलटले तरी मॉं काही मीडियावर प्रसन्न व्हायला तयार नव्हत्या.
** औरंगाबाद. रात्री १ वाजून ३५ मिनिटं
शेवटी एका हातात त्यांचा फेव्हरिट त्रिशुल आणि दुसर्या हातात गुलाबाचं फूल, डोळं बंद, मान एकीकडे झुकलेली अशा अवस्थेत राधे मॉं खोलीच्या बाहेर पडल्या आणि त्यांच्या भक्तांनी जयजयकार सुरू केला…
*** राधे मॉंची प्रतिक्रिया घेण्यासाठी १२-१५ तास थांबलेल्या मीडियाच्या पत्रकारांनी अर्थातच एखादा बाईट मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले. पण त्यांची इतक्यात बोलायची इच्छा नसावी, कारण त्यांच्या एका भक्तिणीनं चक्क त्यांना कडेवर उचलून घेतलं आणि ती वेगानं गाडीकडे निघाली. पण थोडं अंतर गेल्यावर त्यांना पुन्हा खाली ठेवलं गेलं. राधे मॉं २ पावलं चालल्या असतील-नसतील त्यांना म्हणे घेरी आली आणि त्या खाली पडल्या. शेवटी त्यांचे मुंबईतले परमभक्त संजीव गुप्ता यांनी आपल्या मॉंना आपल्या खांद्यावर उचलून घेतलं आणि गाडीत बसवलं.
राधे मॉंनी दोन शब्द तरी बोलावेत म्हणून कॅमेरेे सरसावून बसलेल्या मीडियाकडे दुर्लक्ष करून राधे मॉंची आलिशान जग्वार सुटली खरी, मात्र थोडी पुढे जाऊन पुन्हा थांबली.
काच खाली केली गेली आणि अखेर राधे मॉं यांनी बाईट देऊन मध्यरात्री रंगलेल्या या नाटकाचं भरतवाक्य उच्चारलं.
आपल्या देशाला संतांची थोर परंपरा आहेच. पण आता वादग्रस्त संतांची ही नवी परंपराही सुरू झालीये. सुखविंदर कौर ऊर्फ राधे मॉं यादेखील याच थोर परंपरेच्या एक पायिक.