राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांचा थेट सवाल
मुंबई : ‘आपल्या बाळाचा टॅबचा हट्ट पुरवण्याऐवजी महापालिका शाळांमधील मुलांचे बालहट्ट पुरवा’,असा सणसणीत टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष मा. श्री. सचिन अहिर यांनी तोला लगावला. मुंबईतील विक्रोळी परिसरातील पार्कसाईट भागातल्या महापालिका शाळेची त्यांनी शनिवारी दुपारच्या सुमारास अचानक तपासणी केली. त्यावेळी महापालिका शाळांची दुरवस्था पाहून त्यांनी ही उद्वीग्न प्रतिक्रिया दिली.
या तपासणीदरम्यान त्यांनी महापालिका शाळेतील मुलांशी जमिनीवर बसूनच प्रत्यक्ष संवाद साधला. या संवादादरम्यान मुलांनी आपल्याला अजूनही रेनकोट, पावसाळी बूट किंवा गमबूट यापैकी काहीच मिळाले नसल्याची माहिती दिली. शाळेतले वॉटर प्युरिफायर नादुरूस्त झाल्याने पाण्याची सुविधाही नसल्याचे सांगत पिण्याचे पाणी आपापल्या घरूनच आणत असल्याचे मुलांनी सांगितले. शिवाय या भेटीदरम्यान शाळांमधील शौचालयांची स्थिती फारच भयानक असल्याची बाब अहिर यांच्या निदर्शनास आली. त्याबाबत मुलांना विचारले असता, अस्वच्छता आणि दुर्गंधीमळे आपण शाळेच्या शौचालयाचा देखील वापर करत नसल्याचे यावेळी बहुसंख्य मुलांनी सांगितले. याबद्दल माध्यमांशी बोलताना सचिन अहिर म्हणाले की, महापालिका शाळांमधील परिस्थिती अतिशय भयानक असून त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. काही मुलांच्या पायात साध्या स्लीपर आहेत तर काही मुले अनवाणीच आहेत. पावसाळा संपत आला तरी मुलांना अजून पावसाळी बूट, रेनकोट मिळालेले नाहीत. म्हणूनच मुलांना टॅब देण्याला आमचा विरोध नाही. पण शाळांमधल्या या प्राथमिक सुविधांकडे किमान लक्ष तरी देणार आहात की नाही?असा आमचा महापालिकेतील सत्ताधार्यांना सवाल आहे. आपल्या बाळाचा टॅब बाबतचा बालहट्ट पुरवाच, पण महापालिका शाळांमध्ये शिकणार्या गोरगरिबांच्या बालकांचे बालहट्ट केव्हा पुरवणार? असा थेट सवालच त्यांनी केला आहे. तसेच यापुढेही शाळा तपासणीची ही मोहिम आपण अशीच सुरू ठेवणार असून दर आठवड्याला मुंबईतील किमान तीन महापालिका शाळांना भेटी देणार असल्याची माहिती सचिन अहिर यांनी दिली.
दरम्यान दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष हे पार्कसाईट भागात महापालिका शाळेच्या तपासणीसाठी येणार असल्याचे समजताच शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी निषेधाचे फलक लावत राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोधात घोषणाबाजी केली. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही शिवसेनेला जशास तसे उत्तर देत त्यांचा विरोध मोडून काढला.