लंडन : ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार मायकेल क्लार्कने विद्यमान अॅशेस मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटीनंतर निवृत्त होणार असल्याचे शनिवारी जाहीर केले.
“ओव्हल कसोटी माझी शेवटची कसोटी असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे मी ठरवले आहे. वाईट खेळ होत असताना संघात रहाणे, मला योग्य वाटत नाही. प्रत्येक लढतीत मी सर्वोत्कृष्ट कामगिरीला प्राधान्य दिले,” असे क्लार्कने म्हटले आहे. क्लार्कने पॅकअपची घोषणा केली तरी क्रिकेट ऑस्ट्रेलियातर्फे (सीए) त्याला दुजोरा देण्यात आलेली नाही. क्लार्कच्या निवृत्तीमागे विद्यमान अॅशेस मालिकेत इंग्लंडकडून झालेला दारुण पराभव हे प्रमुख कारण आहे.
इंग्लंडमध्ये सलग चौथ्या खेपेस अॅशेस जिंकता न आल्याने क्लार्क टीकेचे लक्ष्य बनला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या पिढीतला एक सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि कुशल कर्णधार अशी ओळख असलेल्या क्लार्कला सर डॉन ब्रॅडमन यांच्या 28 कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी साधण्यासाठी केवळ एका शतकाची आवश्यकता आहे.
सध्या त्याला फॉर्म राखता आलेला नाही. कधी पाठीची दुखापत तसेच हॅमस्ट्रिंग दुखापतीने डोके वर काढले. क्लार्कने 114 कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे.
क्लार्कनंतर ऑस्ट्रेलियाची धुरा स्टीव्हन स्मिथकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. अॅशेस मालिकेतील पाचवी आणि अंतिम कसोटी 20 ऑगस्टपासून ओव्हलवर खेळवली जाणार आहे.