मुंबई : ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्मांचे स्मरण करण्यात येते. मात्र या कार्यक्रमाकडे सत्ताधारी मंत्र्यांनी पाठ फिरवल्याने चहूबाजूंनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. भाजपा व शिवसेनेचा कोणीही नेता इकडे फिरकला नसल्याने विरोधकांसह सर्वच स्तरातून टीका करण्यात आली.
सोशल मिडीयावर याबाबत जोरदार चर्चा झाल्यानंतर अखेर सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सायंकाळी येथे हजेरी लावली.
महात्मा गांधी यांनी ऑगस्ट क्रांती मैदानातून 1942 मध्ये ब्रिटिश सरकार चले जावचा इशारा दिला होता. या क्रांती दिनानिमित्त ऑगस्ट क्रांती मैदानात मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांनी उपस्थित राहून हुतात्मांना मानवंदना अर्पण करण्याची परंपरा आहे. या मैदानात 9 ऑगस्ट रोजी हुतात्म्यांना अभिवादन केले जाते. मात्र विद्यमान सरकारला हुतात्म्यांचा विसर पडल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मैदानात येऊन हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मात्र दुपारपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सरकारमधील एकही मंत्री मैदानाकडे न फिरकल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने यावरुन सरकारवर टीकेची झोड उठवली. विद्यमान सत्ताधार्यांनी ही परंपरा मोडणे दुर्दैवी बाब आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही अखेर ऑगस्ट क्रांती मैदानात उपस्थिती लावली. क्रांती दिनाच्या दिवशी अशा प्रकारचे राजकारण करणे योग्य नाही, असे रावसाहेब दानवे यावेळी म्हणाले. तसेच, मी रेल्वेतून उतरल्यानंतर थेट क्रांती मैदानात गेलो. काँग्रेसच्या सांगण्यावरुन नाही गेलो. माझ्या आधी विनोद तावडेही तेथे पोहचले होते, असेही दानवे यावेळी म्हणाले.