नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या डीएनएवर केलेल्या टीकेविरोधात नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव ‘शब्द वापसी’ अभियान राबवणार आहेत. यासाठी मंगळवारी ते संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहे.
याप्रकऱणी वारंवार विनंती केल्यानंतरही मोदींनी आमच्या डीएनएवरुन केलेले विधान मागे घेतलेले नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात ‘शब्द वापसी’ मोहीम राबवत आहोत, असे नितीश यांनी ट्विटरवरुन सांगितले.
या मोहिमेत बिहारमधील ५० लाख नागरिक सहभागी होणार आहेत. तसेच डीएनए टेस्टसाठीचा नमुनाही आम्ही मोदीजींना पाठवणार आहोत असेही पुढे नितीश म्हणाले.
२५ जुलै रोजी मुझ्झफरनगर येथील सभेदरम्यान मोदींनी नितीश कुमारांवर डीएनएवरुन टीका केली होती. नितीश कुमार यांच्या डीएनएमध्ये काहीतरी गडबड आहे असे विधान त्यांनी केले होते. या विधानानंतर नितीश यांनी मोदींचे डीएनवरुन केलेले विधान हे बिहारच्या जनतेचा अपमान असल्याचे म्हटले होते.