माथेरान : पनवेल-माथेरान रस्त्याची माथेरानकरांची चार दशकांपासून मागणी आहे. या पर्यायी रस्त्यामुळे माथेरान हे नवी मुंबईला जोडले जाणार असल्याने या रस्त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. ९)येथे दिली. पनवेलहून धोदानीमार्गे डोंगर ट्रेक करून आलेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांची माथेरानचे नगराध्यक्ष गौतम गायकवाड, माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांनी भेट घेतली.
या वेळी भाजपचे शहराध्यक्ष वसंत कदम, अरविंद शेलार, शिवसेनेचे प्रसाद सावंत आदी उपस्थित होते. पनवेल, नवी मुंबईला लागून माथेरान आहे. सध्या माथेरानला येण्यासाठी पर्यटकांना लांबचा वळसा मारून यावे लागते. पनवेलमार्गे माथेरानच्या पायथ्याला असलेल्या धोदानीपर्यंत रस्ता आला आहे. पुढे धोदानी ते माथेरान हा जेमतेम पाच किलोमीटरचा रस्ता झाल्यास माथेरानच्या विकासाचा नवा मार्ग खुला होईल. याबरोबर फ्युनिकुलर रेल्वेचा प्रस्तावदेखील मान्य होण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या दोन्हीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.