संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : महानगरपालिकेचे पाचवे सभागृह अस्तित्वात येवून तीन महिन्याचा कालावधी लोटला तरी अद्यापी प्रभाग समिती अध्यक्षपदाची कार्यवाही सुरू न झाल्याने विषय समिती, स्थायी समिती आदी ठिकाणी वर्णी न लागलेल्यांच्या माथी आता प्रभाग समिती अध्यक्षपदाचा टिळा लावला जाणार असल्याची चर्चा नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
22 एप्रिल 2015 रोजी नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाचव्या सभागृहासाठी 111 प्रभागांकरता सार्वत्रिक निवडणूका झाल्या. 23 एप्रिल रोजी मतमोजणी झाली. 9 मे रोजी नवीन सभागृह अस्तित्वात आले. 6 ऑगस्ट रोजी महानगरपालिकेच्या विषय समिती-उपसभापतींची निवड करण्यात आली. महापालिकेचे पाचवे सभागृह अस्तित्वात येवून आता तीन महिन्याचा कालावधी लोटला तरी सत्ताधार्यांकडून तसेच महापालिका प्रशासनाकडून प्रभाग समिती अध्यक्षपदाकरता कोणत्याही हालचाली सुरू झाल्या नसल्याचे महापालिका वर्तुळात पहावयास मिळत आहे.
स्थायी समिती व विषय समितीपदी वर्णी न लागलेल्या पक्षातील अन्य घटकांची प्रभाग समिती अध्यक्षपदी वर्णी लागली जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. फक्त निवडणूका कधी होणार आणि कोणाची वर्णी लागणार इतकाच उत्सुकतेचा विषय बाकी आहे.