पनवेल : सिडकोने खारघर वासियांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येत्या 15 दिवसात सोडविला नाही, तर खारघर येथील सिडको कार्यालयास टाळे ठोकू असा, इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोला आज दिला.
खारघर सेक्टर 30, 34, 35 सह खारघर परिसरात सिडकोच्यावतीने होणार्या अपुर्या पाणी पुरवठयामुळे येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. याचा जाब विचारण्यासाठी नागरिकांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली खारघर येथील सेक्टर 04 मधील सिडकोच्या कार्यालयावर मोर्चा काढून अधिकार्यांना घेराव घातला.
यावेळी सिडकोच्या अधिकार्यांनी येत्या काही दिवसात पाण्याची नेमकी काय अडचण आहे ती पाहून ती दुर करू असे आश्वासन दिले. मात्र या आश्वासनावर आमदार प्रशांत ठाकूर समाधानी झाले नाहीत, त्यांनी सिडकोच्या ढिसाळ कारभारावर ताषेरे ओढले व संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. वाढत्या लोकसंख्या नुसार सुविधा देण्याची क्षमता वाढविण्याची गरज असताना सिडको मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे. ज्या अर्थी सिडकोने येथे इमारती उभारल्या त्या प्रमाणे सोयी सुविधा देण्याचे कर्तव्य पार पाडावे, अशी समजही त्यांनी सिडकोच्या अधिकार्यांना दिली. वारंवार चालढकलपणा करणे हा अनागोंदी कारभार सिडकोने बंद करावा व नागरिकांना योग्य सुविधा द्याव्यात, असे सांगतानाच येत्या 15 दिवसात जर नागरिकांना होणारा पाण्यासंदर्भातला त्रास दूर झाला नाही तर येथील सिडकोच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा संतप्त इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोच्या अधिकार्यांना दिला.
यावेळी सिडकोचे अधिक्षक अभियंता प्रदीप डहाके, कार्यकारी अभियंता बोकडे, भाजपाचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, युवा नेते प्रभाकर जोशी, ओवेपेठ ग्रामपंचायतीचे उपसरपंच साजिद पटेल, शत्रुघ्न काकडे, किर्ती नवघरे, गुरूनाथ म्हात्रे, कुरघुडे मॅडम, ईर्शाद शेख, सुभेदार मॅडम, केसरकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.