मुंबई : परवडणार्या किंमतीत मजबूत, टिकाऊ घरे कशी बांधता येतील याचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तांत्रिक तज्ञांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या गृहबांधणी प्रकल्पांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासंबंधात ही समिती सरकारला सल्ले देईल.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे वेळ वाचेल, बांधकाम खर्च कमी होण्यास मदत होईल. परवडणार्या किंमतीतील घर रहाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असले पाहिजे. ते घर भूकंप रोधक असावे, पर्यावरणानुकूल असावे. तांत्रिक तज्ञांच्या समितीला अहवाल तयार करण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन गृहबांधणी प्रकल्पाची किंमती कशी कमी होईल हे पाहणे या समितीचे मुख्य काम आहे. या समितीने आपला अहवाल सरकारला सोपवल्यानंतर म्हाडा, एमएमआरडीए या सरकारी गृहनिर्माण संस्था आपल्या मोठया प्रकल्पांमध्ये या सूचनांवर अंमलबजावणी करतील.
गृहबांधणी क्षेत्रातील तंत्रज्ञान मागच्या काही वर्षात मोठया प्रमाणात बदलले आहे याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही असे एका अधिकार्याने सांगितले. गृह विभागाचे प्रधान सचिव या समितीचे अध्यक्ष आहेत.
सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव, म्हाडाचे सीईओ आणि उपाध्यक्ष, आयआयटी मुंबईचे प्राध्यापक रवि सिन्हा, व्हीजेटीआयचे नागरी विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत भावे आणि म्हाडाचे मुख्य अभियंते यांचा या समितीमध्ये समावेश आहे.