मुंबई : कौटुंबिक हिंसाचार प्रकरणातील वादग्रस्त अध्यात्मिक गुरु राधे माँ हीचे रविवारी मुंबईत आगमन झाले. माझ्या नावाचा खोटा प्रचार करणे सुरू असून मी निर्दोष आहे असे म्हणत तिने आपल्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचा दावा मुंबईत परतल्यावर केला आहे.
जिसका नाम है, वही बदनाम है असे फिल्मी स्टाइलमध्ये तिने उत्तर दिले. राधे माँच्या उत्तराने आजुबाजुला असलेल्या भक्तांनी तिच्या नावाचा जयघोष केला.
औरंगाबादहून विमानाने ती रविवारी सकाळी मुंबईत पोहोचली. जे माझ्या विरोधात कटकारस्थान करत आहेत, त्यांचा विनाश अटळ आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे की नाही याबाबत काहीही माहित नसल्याचे तिने सांगितले. देवाच्या नजरेत मी निर्दोष आहे, अशी प्रतिक्रिया तिने यावेळी दिली.
राधे माँच्याविरोधात निक्की गुप्ता या महिलेने हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केला असल्याबाबत कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कांदिवली पोलिसांनी गुप्ता कुटुंबीयांसह राधे माँवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे. त्या अनुषंगाने आरोपींची चौकशी केली जाणार आहे.
राधे माँ या प्रकरणातील सात क्रमांकाची आरोपी असून तिची चौकशी केली जाणार असल्याची माहिती कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांनी दिली.