मुंबई : चिक्की घोटाळ्यामुळं चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे नव्या वादात अडकल्या आहेत. दुष्काळी भागाच्या दौर्यावर असताना पंकजांनी स्वत:च्या पायातील चप्पल सोबतच्या कर्मचार्याला उचलायला लावल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आहे. तसं दृश्यच वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झाल्यानं पंकजांवर टीकेची झोड उठली आहे.
पंकजा मुंडे यांनी नुकताच परभणी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला. या दौर्यादरम्यान पावसामुळं चिखलमय झालेल्या एका रस्त्यावरून जात असताना त्यांनी स्वत:च्या पायातील चप्पल काढून ठेवली. त्यांची ही चप्पल सोबतच्या कर्मचार्यानं हातात घेतली आणि तो त्यांच्या मागे चालू लागला. एका वृत्तवाहिनीनं या प्रसंगाचं चित्रण केलं. ते प्रसिद्ध होताच विरोधकांनी पंकजा मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘पंकजा मुंडे यांचं हे वर्तन अत्यंत आक्षेपार्ह आहे. हे सरकार कोणत्या मानसिकतेचं आहे हेच यातून दिसतं, अशी टीका कॉंग्रेसनं केली आहे. ‘शेतकरी व गोरगरिबांचं भलं करण्याच्या या सरकारच्या बाता म्हणजे निव्वळ देखावा आहे. जे मंत्री स्वत:ची चप्पल एखाद्या सामान्य गरीब माणसाला उचलायला लावतात, ते शेतकर्यांचं काय भलं करणार,’ असा सवाल कॉंग्रेसचे प्रवक्ते नासिर जकारिया यांनी केला आहे.
पंकजा मुंडे यांनी मात्र चप्पल उचलणारा माणूस आपला खासगी कर्मचारी होता, सरकारी नव्हता,’ असं म्हणत स्वत:चा बचाव केला आहे. ‘रस्त्यावर चिखल होता म्हणून मी चप्पल काढली होती. कुणीतरी ती चप्पल उचलली आहे हे मला माहीतही नव्हतं, अशी सारवासारवही त्यांनी केली. ‘मी चप्पल काढली आणि ती एका व्यक्तीनं उचलली हे मीडियानं दाखवलं. पण अनवाणी पायांनी चालताना मला किती त्रास होत होता हे दाखवलं नाही,’ असं म्हणत त्यांनी मीडियावरच टीका केली.