चंद्रपूर : ‘ही खार माझा वारंवार पाठलाग करते’ अशी तक्रार एका महिलेने पोलिसांकडे केली होती. जर्मनीतील ही घटना चर्चेचा विषय ठरली होती. पोलिसांनी त्या खारीला अटकही केली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे अशीच घटना उघडकीस आली आहे. यात आरोपी पोपट आहे. ‘हा पोपट मला कायम शिवीगाळ करतो’, अशी तक्रार शेजारच्या वृद्ध महिलेने थेट पोलिसांत केली. पोलिसांनी या ’आरोपी’ पोपटाला ’अटक’ केली. चौकशी सुरू झाली. मात्र चौकशीदरम्यान, पोलिसांना या पोपटाकडून गुन्ह्याची कबुली घेता आलेली नाही. एरवी कायम ’पोपटपंची’ करणार्या या पोपटाने चौकशीदरम्यान चकार शब्दही काढला नाही! राजुर्यातील ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.
राजुरा येथील मस्जीद वॉर्डात भाऊराव वाटेकर राहतात. हे ‘पोपटराव’ वाटेकर यांच्याच कुटुंबातील सदस्य आहेत. घरातील या पोपटाने सार्यांना लळा लावला. त्याच्या बोलण्याचे तर वस्तीतील नागरिकांना, परिचितांना भारी कौतुक! मात्र बोलण्याच्या नादात या पोपटाचा तोल गेला आणि तो शिवीगाळ करू लागला. याचा सर्वाधिक त्रास झाला तो वाटेकर यांच्या शेजारी राहणार्या ७५ वर्षीय जनाबाई दोनारकर यांना. वाटेकर यांच्याकडील हा पोपट मला वारंवार शिवीगाळ करतो, अशी तक्रार जनाबाईंनी पोपटमालकाकडे केली. मात्र काहीच उपयोग झाला नाही. अखेरीस जनाबाईंनी पोलिसांत तक्रार केली.
जनाबाईंची ही तक्रार सुरुवातीला पोलिसांनी गांभीर्याने घेतली नाही. मात्र जनाबाई आपल्या भूमिकेवर ठाम होत्या. आपबिती वारंवार सांगत होत्या. ही महिला इतक्या आग्रहाने व्यथा मांडत आहे तेव्हा खरे काय हे तपासून बघूच म्हणून पोलिससूत्रे हलली. सोमवारी मालकाला पोपटासह पोलिस ठाण्यात हजर होण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार वाटेकर पोपटाला घेऊन पोलिस ठाण्यात आले. पोपटाची चौकशी सुरू झाली. पोपट शिवीगाळ करतो की नाही, यावर हे निष्पन्न होण्याचे एकमेव माध्यम म्हणजे प्रत्यक्ष पोपटाचे बोलणे. मात्र पोपट हुशार निघाला. त्याने पोलिस ठाण्यात एकही वाईट शब्द उच्चारला नाही.
हा पोपटाने काही केल्या बोलेचना! त्याने ‘तोंड उघडावे’ म्हणून पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरू झालेत. तब्बल १२ पोलिस कर्मचारी या कामी लागले. पोपट काही बधला नाही. या चौकशीदरम्यान, जनाबाईंना पोपटासमोर आणण्यात आले. त्यांना बघून तरी पोपट बोलेल आणि त्याची पोलखोल होईल, असे पोलिसांना वाटले. मात्र हा प्रयत्नही फोल ठरला. अखेरीस पोपटाला बोलते करण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांनी हा पोपट वनविभागाकडे सोपविला.