अहमदनगर/पुणे- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराविरोधात संभाजी ब्रिगेडसह राज्यातील अन्य विविध संघटनांनी पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊ नये, अशी मागणी केली आहे.
संभाजी ब्रिगेड ही संघटना तर थेट रस्त्यावर उतरली असून या वादाला आता हिंसक वळण लागले आहे. संघटनेच्या हिंसक कार्यकर्त्यांनी पंढरपूर येथे राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) गाडी जाळली असून अनेक ठिकाणी जाळपोळ केल्याचे वृत्त आहे. तर नांदेडमध्येही एसटीची तोडफोड करण्यात आली.
संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी पुरंदरेंना जाहीर झालेल्या पुरस्काराविरोधात घोषणाबाजी करत थेट गृहराज्य मंत्री राम शिंदे यांच्या कार्यालयावर दगडफेक करुन काचा फोडल्या. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतल्याने कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत आणलेली पत्रके तिथेच टाकून पळ काढला. या परिसरात तणावाचे वातावरण आहे.
सांगली, सातारा आणि पुण्यातही विविध संघटनांनी छत्रपती शिवरायांची बदनामी करणार्या पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊ नये, अशी मागणी केली आहे.
पुण्यात विविध संघटनांच्या वतीने पिंपरी येथील आंबेडकर पुतळ्यासमोर मंगळवारी दुपारी निषेधसभा घेण्यात आली. यावेळी राज्य सरकारचा निषेधही करण्यात आला.
यावेळी पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे, नागरी हक्क सुरक्षा समितीचे मानव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, क्रांती रिक्षा सेनेचे श्रीधर काळे, महाराष्ट्र फेरीवाला महासंघाचे काशिनाथ नखाते, भारीप बहुजन महासंघाचे के. डी. वाघमारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे गौतम आरकडे तसेच वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, समता अधिकार आंदोलन, बाफसेफ बचाव कृती समिती, रयत विद्यार्थी विचार मंच, क्रांतिवीर बिरसामुंडा आदिवासी सामाजिक संघटना, नागरी सुरक्षा समिती, रिक्षा पंचायत, सातारा जिल्हा मित्र मंडळ, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, सम्यक विद्यार्थी आंदोलन या विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.