मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरुन जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्यात येत असताना, आता या पुरस्कारा विरोधात दाखल झालेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
त्यामुळे बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. उलट न्यायाधीशांनी न्यायालयाचा कामकाजाचा महत्वाचा वेळ वाया घालवला म्हणून याचिकाकर्त्यांना दहा हजार रुपयांचा दंड ठेठावला आहे.
पुरस्कार विरोधकांनी निकषांच्या आधारे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र बुधवारी उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. आज संध्याकाळी राजभवनावर समारंभपूर्वक बाबासाहेबांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
विविध संघटनांचा बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याला विरोध असल्याने राज्य सरकारने राजभवनावर पुरस्कार सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला.
मंगळवारी संध्याकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पानिपतकार विश्वास पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पुरस्कारासाठी बाबासाहेंबाची निवड करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले तर, संभाजी ब्रिगेडकडून राज्यात काही ठिकाणी हिंसक आंदोलनाच्या घटना घडल्या होत्या. आज राजभवन परिसरात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, या कार्यक्रमाचे जवळपास अडीचशे लोकांना निमंत्रण आहे.