नवी दिल्ली : आयपीएलची फ्रँचायजी असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबची को-ओनर असलेल्या प्रिती झिंटाला तिच्या संघातील काही खेळाडू सामना गमावण्यसाठी संशयास्पद बाबींमध्ये सहभागी असल्याचा संशय आहे. प्रितीने या महिन्यात बीसीसीआयच्या अधिकार्यांबरोबर झालेल्या बैछकीत हा संशय व्यक्त केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने तसा दावा केला आहे.
वृत्तपत्रातील बातमीनुसार प्रिती झिंटा आणि आयपीएल वर्किंग ग्रुपची मिटींग ८ ऑगस्टला झाली होती. त्यात झिंटाने अधिकार्यांना सांगितले की, प्रितीला तिच्या आजुबाजुला अशा प्रकारच्या संशयास्पद हालचाली झाल्याचे प्रकर्षाने जाणवले. याबाबत तिला सांगायचेही होते पण तिच्याकडे त्यासाठी ठोस पुरावे नव्हते. प्रितीच्या मते त्यांच्या टीमचा निकाल सामन्यापूर्वीच ठरलेला असायचा असे तिला जाणवले होते.
*** काय म्हणाली प्रिती..
प्रितीने अधिकार्यांना सांगितले की, लोक जेव्हा त्यांच्या टीमच्या निकालाबाबत सामन्याच्या आधीच अगदी तंतोतंत अंदाज लावू लागले तेव्हा तिला संशय आला. प्रितीने मानसशास्त्राचा अभ्यास केला आहे. त्यामुळे कोणाच्या मनात काय सुरू आहे, याबाबत समजत असल्याचे तीने सांगितले. जे खेळाडू प्रामाणिकपणे खेळत नाही, असे तिला वाटत होते, त्यांची टर उडवल्याचेही प्रितीने सांगितले. तसेच त्यांना ड्रॉप करून परत लिलावासाठी त्यांची नावे पाठवल्याचेही प्रिती म्हणाली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका खेळाडूबरोबर प्रितीची याबाबत चर्चाही झाली होती. त्यानंतर त्यांनी इतर संघांना ज्या खेळाडूंवर संशय होता, त्यांची नावेही सांगितली.
*** पारदर्शक स्पर्धेसाठी वर्किंग ग्रुप
या बैठकीत आयपीएलशी संलग्न व्यक्तींबरोबरच आयपीएल वर्किंग ग्रुपचे मेंबर आणि चेअरमन राजीव शुक्ला, बीसीसीआयचे सेक्रेटरी अनुराग ठाकुर, बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली यांचीही उपस्थिती होती.
बीसीसीआयने २१ जुलैला हा ग्रुप तयार केला होता. आयपीएलमध्ये भ्रष्टाचाराबाबत जस्टीस लोढा यांच्या निर्णयानुसार आयपीएल ९ साठी रोडमॅप तयार करायचा होता. जस्टीस लोढा समितीच्या रिपोर्टमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्सवर दोन वर्षांचा बॅन लावण्याचा आदेश देण्यात आला होता.